पुणे : किरकोळ वादातून टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने तरुणाच्या अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल शितोळे (वय २३, रा. महादेवनगर, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पप्पू गोवेकर याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शितोळे याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितोळे आणि गोवेकर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. कोंढवा परिसरातील एका गोदामाजवळ रविवारी (२२ जून) मध्यरात्री दोनच्या सुमारास गोवेकर आणि साथीदारांनी शितोळेला गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात शितोळे गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.