पुणे : प्रेमसंबंधाच्या संशयातून सहायक व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून कंबरेचा पट्टा आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, ‘पोलीस चौकीच्या बाहेर उभी असलेली मुलगी खोटी तक्रार देऊन तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकीही तरुणाला देण्यात आली आहे.

याप्रकरणी, फुलेनगर येथील २८ वर्षांच्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून वाघोली पोलिसांनी आदर्श चौधरी (वय २४, रा. लोणावळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाघोलीमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मोकळ्या मैदानामध्ये शनिवारी (दि.२१) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विमाननगर येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहेत. कंपनीमधील एका तरुणीबरोबर आदर्श चौधरी याचे प्रेमसंबंध होते. एप्रिल २०२५ मध्ये या तरुणीनेच फिर्यादी यांची आदर्श चौधरीबरोबर ओळख करून दिली होती. त्यानंतर ते आदर्श याच्याबरोबर कधी भेटले किंवा बोलले नव्हते.

कंपनीत असताना आदर्श तेथे आला असल्याचे समजल्यावर फिर्यादी यांनी दूरध्वनी केला. सायंकाळी सात वाजता कंपनीतून सुटल्यावर ते कंपनीच्या दारात भेटले. थोडा वेळ गप्पा मारल्यावर आदर्शच्या दुचाकीवरून ते वाघोली येथील सेंट जोसेफ स्कूलच्या मैदानामध्ये गेले. तेथे गेल्यावर ‘माझे प्रेमसंबंध संपण्याला तू कारणीभूत आहेस, तुझ्यामुळेच सर्व काही झाले. मी आता तुझ्या आयुष्याची वाट लावणार,’ असे म्हणून आदर्शने फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

कंबरेचा बेल्ट काढून त्याने मारू लागला. तेथेच पडलेले लाकूड उचलून त्याने पाठीत मारहाण केली. बंदुकीचा धाक दाखविला. विमाननगर पोलीस चौकीच्या बाहेर उभी असलेली मुलगी तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार देऊन तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकी देऊ लागला. फिर्यादीला तेथेच सोडून दुचाकीवरून तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी मित्राला बोलावून घेतले. ससून रुग्णालयात उपचार घेऊन त्यानंतर तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक केदार तपास करीत आहेत.