पुणे : दरवर्षी १ जून रोजी केरळमार्गे देशाच्या मुख्य भूमीवर दाखल होणारे र्नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) यंदा चार ते सात दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ४ जून रोजी पाऊस केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तविला असून ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने ७ जूनची शक्यता दिली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यापर्यंत देशाच्या बहुतांश भागांत उष्मा कायम राहण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी र्नैऋत्य मोसमी पाऊस १ जून रोजी केरळ किनारपट्टीवरून भारतात प्रवेश करतो. त्यानंतर भारतीय उपखंडातील त्याचा प्रवास सुरू होतो. भारतासाठी मान्सूनचे आगमन आणि प्रमाण हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळय़ाचा विषय असतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या पावसाबाबत आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार मान्सून आगमनाला विलंब होणार आहे. यंदा सरासरीएवढाच पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मान्सूनचे उशिरा होणारे आगमन हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

पावसाचा अंदाज वर्तविताना गेल्या ५० वर्षांत झालेल्या पावसाचा अभ्यास करण्यात येतो. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस झाला. विभागाच्या अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस सरासरीएवढा पडण्याची शक्यता सुमारे ३५ टक्के, सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता सुमारे २९ टक्के तर सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता केवळ ११ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.

उशीर का?

‘एल निनो’ची स्थिती, हिंदू महासागरातील द्विध्रुव परिस्थिती आणि उत्तर गोलार्धात बर्फाचे आच्छादन कमी होण्याची शक्यता यांसारख्या कारणांमुळे यंदाच्या र्नैऋत्य मोसमी पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र ‘एल निनो’ नेहमीच र्नैऋत्य मोसमी पावसाला मारक ठरतो, असे नसल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. हवामान विभागानेही यंदा पाऊस सरासरीइतकाच राहील, असा अंदाज यापूर्वी वर्तविला आहे.

अन्न, पाणी आणि वीज..

र्नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनावर कृषिप्रधान देशांचे अर्थचक्रही मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असते. भारतातील ५२ टक्के शेती मोसमी पावसावर विसंबून असते. तसेच देशभरातील धरणांमध्ये पुढील वर्षभरासाठी लागणाऱ्या पाण्याची साठवणूकही याच चार महिन्यांमध्ये होते. जलविद्युत प्रकल्पांमधून विजेची निर्मितीही धरणांमधील पाण्यावरच विसंबून असते. त्यामुळे अन्न, पाणी आणि वीज या तीन गरजा मोसमी पावसामुळेच भागतात.

पाऊस दाखल होण्याची तारीख आणि पावसाचे प्रमाण यांचा एकमेकांशी संबंध नाही. तसेच केरळमध्ये लवकर किंवा उशिरा येणारा पाऊस त्याच प्रमाणात देशभरात पसरेल, असेही नाही. मोसमी पावसावर परिणाम करणारे अनेक जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक घटक असतात.  

– एम. मोहपात्रा, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain late this year delay of four to seven days in kerala ysh