बाइक-टॅक्सी विरोधी आंदोलन समितीच्या वतीने काल पुणे शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शहरातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवा बंद करण्यात यावी या मागणीसाठी पुणे शहरातील हजारो रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आज पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील राज महाल येथे आंदोलकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाइक टॅक्सीमुळे आमचं जगणं मुश्किल झाले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडविले आहेत.तुमचा शब्द कोणी टाळत नाही. आमचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याकडे केली.

मी या संदर्भात संबधीतासोबत बोलतो आणि तुम्हाला कळवितो. आज संध्याकाळपर्यंत कोणाशी तरी नक्की बोलणं होईल असं राज यांनी या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर पुन्हा एका पदाधिकाऱ्याने यापूर्वी तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवले आहेत असं सांगत आमचीही मदत करावी असं गाऱ्हाणं घातलं. यावर राज यांनी आपल्या आसनावरुन उठता उठता, “आम्ही फक्त प्रश्न सोडवयालाच असतो,” असं म्हटलं. राज ठाकरेंची ही पाच शब्दांची प्रतिक्रिया ऐकून उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

यापूर्वीही अनेकदा राज यांनी मतदानाच्या वेळेस अनेकजण पाठ फिरवतात अशी खंत बोलून दाखवली होती. वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी वेळोवेळी राज यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागण्या मांडत असतात. याच मागण्यांच्या माध्यमातून आज पुण्यात झालेल्या भेटीत राज यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीमध्ये अप्रत्यक्षपणे यावर भाष्य केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray witty comment saying we are here to solve problems svk 88 scsg