पिंपरी : सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पसार असलेल्या राजेंद्र हगवणे, पुत्र सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर बावधन पोलिसांनी शनिवारी हगवणे कुटुंबीयांची कसून चौकशी केली. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील कलमात वाढ करीत नीलेश चव्हाणलाही आरोपी करण्यात आले आहे. तसेच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर लाखबंद (सील) केल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम) यांच्या आत्महत्येप्रकरणी पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. पाचही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या आरोपींची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी बावधन पोलीस ठाण्यात कसून चौकशी केली.

सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे म्हणाले, ‘आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. राजेंद्र हगवणे यांचे बँकेतील ‘लॉकर’ लाखबंद केले आहे. वैष्णवीला विवाहात देण्यात आलेले ५१ तोळे सोन्याचे दागिने हगवणे कुटुंबाने बँकेकडे गहाण ठेवले आहेत. सोने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. याबाबत बँकेशी पत्रव्यवहार केला असून, गहाण ठेवलेले सोने हे हुंड्यातील असल्याचे कळविले आहे. हगवणे पिता-पुत्रांनी पसार असताना वापरलेल्या दोन आलिशान मोटारीही जप्त केल्या आहेत.

चव्हाणच्या शोधासाठी तीन तपास पथके

वैष्णवीच्या दहा महिन्यांच्या बाळाला आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीय गेले असता नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. औदुंबर काॅलनी, वारजे जकातनाका) याने पिस्तूल दाखवले होते. बाळाची हेळसांड करून संरक्षणास बाधा आणल्याने हगवणे कुटुंबीयांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात ‘मुलांची काळजी व संरक्षण’ या कलमाची वाढ करण्यात आली आहे. त्यात नीलेश याला आरोपी करण्यात आले आहे. त्याच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची तीन तपास पथके रवाना केली आहेत. तसेच, त्याच्या भावाला शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चव्हाणविरुद्ध यापूर्वी एक गुन्हा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कस्पटे कुटुंबीयांना धमकाविणारा आरोपी नीलेश रामचंद्र चव्हाण याच्याविरुद्ध यापूर्वी नात्यातील एका महिलेचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये दाखल झाला होता. वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी नीलेश रामचंद्र चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाण याच्याविरुद्ध नात्यातील महिलेने २०२२ मध्ये वारजे माळवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चव्हाणने तिचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केले होते, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

हगवणे पिता-पुत्रांनी पसार असताना वापरलेल्या दोन आलिशान मोटारी जप्त केल्या आहेत. सोने गहाण ठेवलेल्या बँकेशी पत्रव्यवहार केला आहे. नीलेश चव्हाण याच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना केली आहेत, असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.