लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मालमत्त्तेत आमदार झाल्यावर घट झाली आहे. गेल्या वर्षी पोटनिवडणुकीच्यावेळी सात कोटी दहा लाख ६५ हजार १४३ रुपयांची स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता असलेल्या धंगेकरांची सुमारे सव्वा कोटीने मालमत्ता कमी झाली आहे.

पोटनिवडणुकीच्यावेळी धंगेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे आठ कोटी ३६ लाख १० हजार ४५६ रुपयांची मालमत्ता होती. मात्र, यावेळी एक कोटी २५ लाख ४५ हजार ३१३ रुपयांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या वर्षी पोटनिवडणुकीच्यावेळी त्यांनी जंगम मालमत्ता ४७ लाख सहा हजार १२८ दाखविली होती. आता त्यांनी ही मालमत्ता २३ लाख २६ हजार ८३ रुपये दाखविली आहे. त्यामुळे त्यांच्या जंगम मालमत्तेत एका वर्षात २३ लाख ८० हजार ४५ रुपयांनी घट झाली आहे. तसेच त्यांच्यावर ७१ लाख १५ हजार ४३५ रुपयांचे कर्जही आहे.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी धंगेकर यांनी अर्ज दाखल केला. धंगेकर हे आठवी उत्तीर्ण आहेत. त्यांच्याकडे रोख ७६ हजार ४०० रुपये, तर पत्नीकडे ६२ हजार १०० रुपयांची रोख रक्कम आहे. धंगेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शेती, सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम व्यवसाय आहे. त्यांची जंगम मालमत्ता २३ लाख २६ हजार ८३ रुपये, तर पत्नीकडे ७२ लाख ३८ हजार ४४३ रुपयांची आहे. त्यांची स्वसंपादित आणि वारसाप्राप्त स्थावर मालमत्ता चार कोटी ५९ लाख ६३ हजार ९५८ आहे, तर पत्नीकडे दोन कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे.

त्यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. तसेच त्यांची दौंड तालुक्यात पिंपळगाव आणि हवेली तालुक्यात नांदोशी येथे शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. धंगेकर यांच्यावर आठ प्रलंबित खटले आहेत.