पुणे : लिव्ह ॲण्ड लायसन्स करारनाम्यांची दस्त नोंदणी करताना बुबुळाची प्रतिमा (आयरीस स्कॅनर) दस्तांची नोंदणी करण्यात येणार आहे. या सेवेला बुधवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. भाडेकरारासाठी वापरण्यात येत असलेल्या २.० संगणक प्रणालीद्वारे आधार पत्रिकेची पडताळणी करताना हाताचे ठसे घ्यावे लागतात. मात्र अनेकवेळा काही ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे उमटत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या वतीने यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

भाडेकरार करण्यासाठी सध्या २.० ही संगणकप्रणाली वापरली जात आहे. मात्र ही संगणकप्रणाली संथ गतीने सुरू असल्याने अनेकदा भाडेकरार करण्यासाठी विलंब लागतो. एका करारासाठी ४० मिनिटे ते दीड तासांचा कालावधी लागतो.  या संदर्भात असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे सचिन शिंघवी, मंगेश पाटील आणि अन्य सदस्यांनी विविध तक्रारी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

भाडेकरार करताना २.० या संगणक प्रणालीवर अनेकदा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाताचे ठसे काही कारणास्तव उमटत नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्याची तसेच कागदपत्रे अपलोड करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून किंवा पैसे जमा करूनही करार पूर्ण होत नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यासाठी संबंधित ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या कोणाला कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) द्यावी लागत होती. मात्र ते देणे सुद्धा धोक्याचे होत असल्याने त्याला पर्याय असावा अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार ,नोंदणी मुद्रांक विभागाच्या संगणक विभागाने भाडेकरार करताना आता सॉफ्टवेअरमध्ये बदल केला आहे.  हाताच्या ठशांसोबत ज्यांचे ठसे उमटत नाहीत त्यांच्यासाठी बुुबुळाच्या प्रतिमेद्वारे आधारची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती शिंघवी यांनी दिली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. तसेच त्यांनी पैसे आणि पूर्ण केलेली प्रक्रिया वाया जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

ज्या व्यक्तीचे तसेच ज्येष्ठांचे वयोमानानुसार, हातांचे ठसे येत नव्हते. त्यांच्यासाठी बुबुळांची प्रतिमेद्वारे आधार पडताळणी करण्याचा पर्याय सुरू करण्यात आला आहे. पडताळणीसाठी हाताच्या ठशांचाही वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला डोळ्याच्या बुबुळाची प्रतिमेचा वापर करून भाडेकरार करणे शक्य होणार आहे, असेही शिंघवी यांनी स्पष्ट केले. सर्व्हिस प्रोव्हायडर्स असोसिएशनची ही मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार हातांचे ठसे न उमटल्यास बुबुळाची प्रतिमेद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे.

भाडेकरारासाठी हा प्रयोग सुरू कऱण्यात आला असून यापुढे  विवाह नोंदणीसाठी हा पर्याय स्वीकारण्याचे विचाराधीन आहे. – अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक)