पुणे : आमदार नितेश राणे यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेकडून निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस आयुक्तालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने निवृत्त पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध यावेळी करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवृत्त पोलिसांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांची कामाची वेळ आठ तास करावी. पोलिसांना टोल माफ करावा. निवृत्तीनंतर पोलिसांना वैद्यकीय उपचार, तसेच सुविधा मिळाव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

हेही वाचा >>>एमपीएससीची उद्या बैठक, कृषि सेवेच्या २५८ पदांबाबत काय होणार निर्णय?

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचेआश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले, तसेच आठवडाभरात सेवापटाची छायांकित प्रत देण्याचे आदेश कार्यालयीन कर्मचाऱ्यांना देण्यात आले. संघटनेचे पुणे विभाग अध्यक्ष सुबराव लाड, अशोक गुंजाळ, प्रकाश लंघे, फत्तेसिंग गायकवाड, रवींद्र कामठे, सदाशिव भगत, कैलास डेरे, हनुमंत घाडगे, आरिफ शेख यावेळी उपस्थित होते.