पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सुनावली. जोसेफ अँथोनी देवनेसन (वय ४०, रा. दापोडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याने १६ वर्षीय मुलाचा विनयभंग केला होता. याबाबत मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १८ एप्रिल २०१९ रोजी दापोडी परिसरात ही घडली होती.

मुलगी एका दुकानात खरेदीसाठी गेली होती. तेव्हा देवनेसन याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून विद्रूप करून टाकीन, तू कोठे चेहरा दाखविण्याच्या लायक राहणार नाही, अशी धमकी दिली होती. त्याने मुलीचा दोन ते तीन वेळा पाठलाग केला होता.

  सरकार पक्षाकडून ॲड. संतोषकुमार पाताळे यांनी बाजू मांडली. या खटल्यात पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष; तसेच पुरावे ग्राह्य धरुन विशेष न्यायालयाने देवनेसनला तीन वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.भोसरी पोलीस ठाण्यातील तत्कालीन उपनिरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.