पुणे : ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करून चोरट्याने त्यांच्याकडील ७८ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे हिंगणे खुर्द भागात राहायला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातून निघाले होते. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. ‘माझ्या नातेवाईकांचे निधन झाले आहे. मला मंदिरात पाच हजार रूपये दान करायचे आहेत. मी तुमच्‍याकडे पाच हजार रूपये देतो. मंदिराच्या दानपेटीत तुम्ही रक्कम अर्पण करा’, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना पूजा साहित्य असलेली पिशवी दिली. ‘या भागात चोरीच्या घटना घडत आहेत. तुमच्याकडील अंगठी काढून पिशवीत ठेवा’, असे चोरट्याने त्यांना सांगितले. चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले. चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून पिश‌वीत ठेवण्याचा बहाणा केला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटा अंगठी लांबवून पसार झाला. पोलीस हवालदार उत्तम तारु तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचारी ज्येष्ठांना अडवून चोरटे बतावणी करतात. त्यांच्याकडील दागिने, रोकड लांबवून चोरटे पसार होतात. पोलीस असल्याची बतावणी, ज्येष्ठांना मोफत धान्यवाटप, महिलांना साडीवाटप अशा प्रकारची बतावणी केली जाते. बतावणी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बतावणी करणारे चाेरटे दिसल्यास त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी किंवा पोलीस नियंत्रण कक्षात (११२) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाणेर परिसरात एटीएममधून पैसे काढणाऱ्या परप्रांतीय कामगारांकडे पोलीस असल्यचाी बतावणी करुन त्यांच्याकडील रोकड लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. याप्रकरणी श्रीराम विकास हानवते (वय ३३, रा. एलिगंट रेसीडन्सी, यमुनानगर, निगडी) याला अटक करण्यात आली आहे. त्याने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत. आरोपी हानवते हा सराइत आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एटीएमची तोडफोड करून रोकड चोरीचा प्रयत्न, तसेच निगडी पोलीस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल आहे. प्राथमिक तपासात हानवतेने एटीएममधून पैसे काढणाऱ्या परराज्यातील कामगारांना पोलीस असल्याची बतावणी करून लूटमारीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.