शहरात आठवडाभरात वेगवेगळ्या अपघातांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचाही समावेश आहे. बहुतांश अपघात हे अतिवेगामुळे झाले आहेत. शहरातील वाढते अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या विचारात घेता आता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षी शहरात ३३४ प्राणांतिक अपघात (फेटल ॲक्सिडेंट) झाले. या अपघातात ३४५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या आठ महिन्यांत शहरातील वेगवेगळ्या भागांत झालेल्या अपघातांत २५० हून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी निश्चितच चिंतेत भर घालणारी आहे. शहरात दररोज एक ते दोन गंभीर अपघात हाेतात. अपघातांची आकडेवारी विचारात घेतल्यास दररोज एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होतो.

मार्केट यार्डातील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू काही महिन्यांपूर्वी झाला. अपघातात महिलेचे दुुचाकीस्वार सासरे गंभीर जखमी झाले होते. या घटनेेनंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी हिंजवडी परिसरात अपघातात एक मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन केले. अशा प्रकाराच्या जनआंदोलनांमुळे प्रशासनही खडबडून जागे होते. वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून तेथे वाहतूकविषयक सुधारणा केल्या जातात.

शहरात गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहने, तसेच चालकांवर कारवाईही केली जाते. पण, एवढे करूनही वाहनचालक सर्रास वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून येते. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाइलवर संभाषण, एकाच दुचाकींवरून तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), मद्य पिऊन वाहन चालविणे, मोटार चालविताना आसनपट्टा (सीट बेल्ट) न लावणे, अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात.

मुळात रस्त्यावरून जाताना वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमभंग करणारे सर्वाधिक दुचाकीस्वार आहेत. शहरातील गल्ली-बोळांपासून गजबजलेल्या रस्त्यांवर दुचाकीस्वार सर्रास वाहतूक नियमभंग करतात. मार्गिकेची शिस्त न पाळणे (लेन कटिंग), अचानक वळणे, सिग्नल मोडणे, अतिवेग आणि दुचाकी चालविताना सर्रास मोबाइलचा वापर असे नियमभंग अपघातांना निमंत्रण देणारे ठरतात. काही दुचाकीस्वार – यात महाविद्यालयीन युवक-युवतींचे प्रमाण अधिक – वाहन चालविताना हेडफोन वापरतात. गाणी ऐकत जाणाऱ्या या चालकांना पाठीमागून येणाऱ्या वाहनांचे भान नसते. अनेक दुचाकींना आरसेही (साइड मिरर) नसतात. त्यामुळे पाठीमागून येणारे वाहन दिसत नाही.

अवजड वाहनांकडून नियमभंग होतात, हेही तितकेच खरे. मात्र, गजबजलेल्या रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वारांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दुचाकी वेडीवाकडी चालविणे, हेडफोनचा वापर हे जिवावर बेतू शकते, याची जाणीव असूनही अनेक दुचाकीस्वार अपघाताला निमंत्रण देत असतात. हेल्मेटच्या वापरावरूनही पुण्यात वाद-विवाद आहेतच.

शहर, तसेच उपनगरात सध्या बांधकामे सुरू आहेत. सिमेंट वाहतूक करणारे डंपर, काँक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनचालकांच्या चुकांमुळे अपघात होत असले, तरी शहराच्या वाढत्या विस्तारात, नवी बांधकामे, जुन्या इमारतींचे पुनर्विकास, उद्योगांसाठी पाठविण्यात येणारा माल यासाठी अवजड वाहनांतून वाहतूक अपरिहार्य ठरते. त्यामुळे, त्यांच्यावर कायमची बंदी घालणे हा उपाय व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, हे मान्यच. पण, ज्या वेळांत आणि ज्या रस्त्यांवर या वाहनांना बंदी आहे, त्या वेळांत अशा वाहनांवर कठोर कारवाई करणे हेही तितकेच आवश्यक आहे. ती व्यवस्थित झाली आणि लहान वाहनांच्या चालकांनी वाहने बेदरकारपणे न चालवता, नियमांचे पालन केले, तर तोही वाहतूक कोंडीवरचा आणि अपघात कमी करण्यासाठी साह्यभूत ठरणारा एक उपाय असू शकतो.

rahul.khaladkar@expressindia.com