Rohit Pawar On Pune Dumper Accident : पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एक २२ वर्षाचा तरुण, एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोट्रे हा डंपर चालक दारू पिऊन डंपर चालवित असल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले आहेत की, “तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही… असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं. यात दोन चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही सहाजणांची मृत्यूशी झुंज सुरुय… अंगावर काटा आणणाऱ्या या घटना का थांबत नाहीत? की गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का?”.

दुर्घटनेतील पीडित हे अमरावतीहून पुण्यात रोजगाराच्या शोधात आले होते. त्यांना अमरावती येथेच रोजगार मिळाल असता तर हा दुर्घटना झाली नसते असे रोहित पवार म्हणालेत. “सकाळी सकाळी ही बातमी पाहून मन सुन्न झालं… ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या भीषण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई द्यावी अशी विनंती देखील त्यांनी सरकारला केली आहे.

हेही वाचा>> पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी

नेमकं काय झालं?

विशाल विनोद पवार (वय २२), वैभवी रितेश पवार (वय १) आणि वैभव रितेश पवार (वय २) या तीन जणांची मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर रविवारी रात्री नऊ जण झोपले होते. त्या रस्त्यावरून रात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे याने त्याच्या ताब्यातील एमएच १२ व्हीएफ ०४३७ या क्रमांकाच्या डंपर ने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar on drunken driver dumper crushes 9 migrant workers from amravati on sleeping footpath 3 dead 6 injured in wagholi rak