रिक्षाच्या धडकेने जखमी झालेल्या पादचाऱ्याला उपचार न मिळाल्याने  मृत्यू

पुणे :  रिक्षाच्या धडकेने जखमी झालेल्या पादचाऱ्याला रुग्णालयात दाखल न करता त्याला महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 विष्णू  साहेबराव आढाव (वय ५२ रा. संत ज्ञानेश्वरनगर, थेरगांव) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालक सचिन थिगळे (रा. जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विष्णू आढाव माळी काम करतात. ते  बाणेर रस्त्याने जात होते. अभिमानश्री सोसायटीजवळ त्यांना रिक्षाने धडक दिली. रिक्षाचालक थिगळे याने मदत करण्याचा बहाणा करीत, आढाव यांना रुग्णालयात दाखल करतो, असे सांगितले. नागरिकांनी पैसे गोळा करुन आढावला दिले. त्यानंतर थिगळेने जखमी अवस्थेतील आढाव यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ सोडले. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. रिक्षाचालकाने महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जखमी अवस्थेतील आढाव यांना सोडून दिल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोालिसांनी रिक्षाचालक थिगळेच्या विरोधात गुन्हा दाखल केला.