पुणे : बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक आणि विक्रेत्यांनी केंद्राच्या ‘साथी’ या पोर्टल प्रणालीवरून सर्व प्रकारच्या बियाणांचे वितरण आणि विक्री करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले असून, पोर्टलचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
परराज्यात उत्पादित झालेले आणि राज्यात वितरण आणि विक्री होणाऱ्या बियाण्यांना ‘साथी’चा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बियाणे उत्पादक, विक्रेत्यांची नोंद ‘साथी’वर करण्यात येणार आहे.
यामुळे कंपन्या, वितरक आणि विक्रेते यांच्यात समन्वय साधून हे सर्व घटक एकाच संगणकीय व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे बियाणे व्यवसायातील गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे, असे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.