लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पाठविलेल्या अहवालाबाबत पोलिसांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी रुग्णालयाला पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या समितीची बैठक आज होणार असून, तातडीने अहवाल पोलिसांना सादर केला जाणार आहे.

गर्भवती ईश्वरी (तनिषा) भिसे हिच्या मृत्यूप्रकरणात ससून रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांना सहा पानी अहवाल पाठविला आहे. त्या अहवालात संबंधित महिलेच्या उपचारावेळी वैद्यकीय दिरंगाई झाली का? तसेच डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला का? असे कोठेही नमूद करण्यात आले नाही. त्यामुळे डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही, याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चार मुद्दे उपस्थित करून पुन्हा ससून रुग्णालयाच्या समितीकडे अभिप्राय मागितला आहे. यावर ससून रुग्णालयाच्या समितीची बैठक उद्या होत आहे. या बैठकीनंतर तातडीने पोलिसांना अहवाल सादर केला जाणार आहे.

गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्यात आरोग्य विभाग समिती, धर्मादाय आयुक्त समिती, माता मृत्यू अन्वेषण समितीसह ससून रुग्णालयातील समितीचा समावेश आहे. ससून रुग्णालयातील समितीने पुणे पोलिसांना नुकताच सहा पानी अहवाल सादर केला.

अहवालानंतर दोषी ठरणार

ससूनच्या अहवालावर पुणे पोलिसांकडून चार मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्या चार मुद्द्यांच्या आधारे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या समितीकडून नव्याने अभिप्राय मागितला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमका गुन्हा दाखल होईल किंवा नाही, नेमके दोषी कोण, हे ठरविता येणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पोलिसांना अहवाल सादर केला होता. या अहवालातील काही मुद्द्यांबाबत पोलिसांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यावर रुग्णालयाच्या समितीची शनिवारी बैठक घेऊन तातडीने अहवाल सादर केला जाईल. -डॉ. यलप्पा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sassoon hospital will give report again to police hospital committee to meet urgently today in pregnant womans death case pune print news mrj