पुणे : दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी असलेला डिजिटल दस्त आता नागरिकांना ‘ई-प्रमाण’ या नव्या संगणकीय प्रणालीद्वारे घरबसल्या मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा सातारा जिल्ह्यात आज, बुधवारपासून दिली जाणार आहे. दस्ताच्या प्रत्येक पानावर दुय्यम निंबधकाची डिजीटल स्वाक्षरी असणार असून ‘ग्रीन टिक’ किंवा ‘डिजिटल टिक’द्वारे दस्तांची कायदेशीर मान्यता तपासता येणार आहे.
नोंदणी महानिरीक्षक विभागाकडून ही सेवा देण्यात येणार आहे. नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवरील ‘ई सर्च’ द्वारे जुने दस्त उपलब्ध होत होते. मात्र, ते कायदेशीर ग्राह्य धरले जात नव्हते. त्यामुळे पुणे शहराचे सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी शहरातील २७ कार्यालयांमध्ये डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त उपलब्ध करण्याचा प्रयोग एका महिन्यापूर्वी सुरु केला होता. त्या प्रयोगांतर्गत पुण्यात आतापर्यंत २७ पैकी १९ कार्यालयांमध्ये साडेचार हजार डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त उपलब्ध करण्यात आले आहेत. त्या धर्तीवर आता नोंदणी मुद्रांक विभागाने संगणक प्रणालीत बदल करून ‘ई प्रमा’’ ही नवी प्रणाली विकसित केली आहे. त्या प्रणालीच्या आधारे आता डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्तांच्या प्रती देण्यात येणार आहेत.
या नव्या प्रणालीनुसार नोंदणीकृत दस्ताची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत नागरिकांना घरबसल्या संदेशाद्वारे किंवा त्यांच्या लॉग इनमध्ये मिळणार आहे. नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवरील ई सर्व्हिसेसच्या माध्यमातून अर्जावर आणि आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या सर्व अर्जांवर दुय्यम निबंधक हे एकत्रितपणे डिजिटल स्वाक्षरी करणार आहेत. ई प्रमाण या संगणक प्रणालीमुळे दस्त पाठविणाऱ्याचे प्रमाणीकरण करता येणार आहे.