पुणे : ईटीएस यंत्र आणि रोव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून खराडी येथील ७०० हेक्टरवरील मिळकतींची मोजणी दोन महिन्यांत पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच खराडीतील मिळकतदारांना कायदेशीर मालकी हक्काचा पुरावा असलेली मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) देण्यात येणार आहे. दोन महिन्यांत खराडीच्या ७०० हेक्टरवरील मिळकतींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उंच इमारतींमुळे अनेकदा रोव्हरच्या वापरावर मर्यादा येतात. त्यामुळे ज्या भागात उंच इमारती आहेत, अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात आला, तर काही भागांत रोव्हर आणि ईटीएस यंत्राचा वापर करून या दोन्हीतील अचूकता तपासून मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, ड्रोनने मोजणी करायच्या सुमारे १०० हेक्टर मिळकतींची ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करण्याचे काम अद्याप झालेले नाही, असे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – “माझी आतल्या गोटातली माहिती आहे की…”, अजित पवारांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान; म्हणाले, “मला वाटत होतं…!”

खराडीचा काही भाग लोहगाव विमानतळाच्या जवळ येतो. त्यामुळे त्याच भागात ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करायची आहे. लष्काराकडून परवानगी मिळत नसल्यामुळे हे काम थांबले आहे. परवानगी मिळाल्यानंतर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून मिळकत पत्रिका देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची हद्द निश्चित होणार आहे. रस्त्यांचे क्षेत्र, लांबी, रुंदी यांची माहिती मिळणार आहे. मिळकतींची संख्या निश्चित होऊन मिळकत कराच्या माध्यमातून महसूल वाढण्यास मदत होणार आहे. सरकारी जमिनींची माहिती जमा होणार आहे. खराडी येथील मोजणींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण करून तेथील मिळकतदारांना मिळकत पत्रिकांचे वाटप करण्यात येईल, असे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी सांगितले.

हेही वाचा – यंदा पाऊस सर्वसाधारणच, मोसमात सरासरीच्या ९६ टक्के; जूनमध्ये मात्र कमी पावसाचा अंदाज

सातबारा उतारे बंद

राज्यातील ज्या शहरांमध्ये नगरभूमापनाचे (सिटी सर्वे) काम झाले आहे. मात्र, मिळकतींचा सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका अशी दोन्हीही सुरू आहेत. किंवा नगरभूमापन झाले असूनही सातबारा उतारा सुरू आहे. अशा शहरात जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोयीनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून फसवणुकीचे प्रकारही समोर आले. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने नगरभूमापन झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित करून प्रायोगिक तत्त्वावर वडगाव शेरीमध्ये जीएआयएस मॅपिंगच्या माध्यमातून नुकताच एक प्रकल्प राबविण्यात आला. त्यामध्ये रोव्हर आणि ईटीस यंत्राचा वापर करून अवघ्या ३५ दिवसांत या गावाची मोजणी पूर्ण करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता खराडी गावची मोजणी करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satbara of properties in pune will be closed forever know how pune print news psg 17 ssb