पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे कार्यप्रशिक्षण समाविष्ट पदवी अभ्यासक्रम अभ्यासक्रम (एईडीपी) पदवीस्तरावर सुरू करण्यात येत आहेत. व्यवस्थापन, तंत्रज्ञान, कौशल्य विकास, वाणिज्य या विद्याशाखांमध्ये मिळून एकूण आठ नवे अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबवले जाणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठांना कार्यप्रशिक्षणाचा समावेश असलेले पदवी अभ्यासक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या अभ्यासक्रमात सैद्धांतिक अभ्यासक्रमाइतकेच प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात प्रशिक्षण, अनुभव हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवीस्तरावरच आवश्यक कौशल्ये, अनुभव प्राप्त करून देणे आणि त्यांची रोजगारक्षमता वाढवण्याचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठातील एकूण आठ पदवी अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत बी.एस्सी. विदा विज्ञान, बी.एस्सी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, बी.एस्सी. थ्रीडी ॲनिमेशन आणि व्हीएफक्स, कौशल्य विकास विभागाअंतर्गत बी.व्होक. रिन्युएबल एनर्जी स्कील्स, बी.व्होक. मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, बी.व्होक. रिटेल मॅनेजमेंट, वाणिज्य शाखेअंतर्गत बी.कॉम. अकाऊंटन्सी अँड टॅक्सेशन, व्यवस्थापनशास्त्र शाखेअंतर्गत बीबीए फॅसिलिटिज अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. त्यासाठी उद्योग क्षेत्रांतील कंपन्या, संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पाटील म्हणाल्या, सुविधा आणि सेवा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांसाठी नवनव्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे बीबीए फॅसिलिटिज अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमातील दोन ते तीन सत्रे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात जाऊन काम करता येणार आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.
सध्याच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. सैद्धांतिक ज्ञानासह प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या कुशल मनुष्यबळाची उद्योगांना गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन विद्यापीठातर्फे ॲप्रेंटिस एम्बेडेड पदवी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासह प्रत्यक्ष कार्यानुभव मिळणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये, कामाची सवय विद्यार्थ्यांना आत्मसात करता येईल. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले पाऊल आहे. त्यामुळे भविष्यातील पिढ्या सक्षम आणि कुशल होतील. – डॉ. पराग काळकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.