पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये १३ डिसेंबर रोजी एक दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रसिकांना दोन तास अधिक संगीत श्रवणाचा आनंद घेता येणार आहे.

अभिजात संगीताच्या क्षेत्रात जगभरात नावलौकिक संपादन केलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा १० ते १४ डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलामध्ये होणार आहे. महोत्सवात सादर होणाऱ्या कलाविष्काराचा आनंद रसिकांना लुटता यावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शनिवार, १३ डिसेंबर रोजी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यावर निर्बंध आहेत. मात्र, यातून वर्षातील १५ दिवस सवलत देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसह राष्ट्रीय सणांना रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा समावेश आहे. पुण्यामध्ये एक दिवस हा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी राखीव ठेवण्यात येतो. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १३ डिसेंबर या दिवशी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापराची मुभा दिली आहे.

रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आल्यानंतर सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला अपवाद करून परवानगी मिळावी यासाठी खटपटही केली गेली. मात्र, ती यशस्वी न झाल्याने महोत्सवाचे स्वरूप बदलण्यात आले. तीन रात्री होणारा हा महोत्सव पाच दिवस होऊ लागला. आता दुपारपासून रात्री दहापर्यंत सत्रे आयोजिण्यात येतात. तसेच, एक किंवा दोन दिवस सकाळीही सत्रांचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने सकाळ आणि दुपारचे रागही रसिकांना ऐकण्याचा आनंद लुटता येतो.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ पं. सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. सवाई गंधर्व यांच्या पहिल्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १९५२ पासून भीमसेन जोशी यांनी गुरुबंधू पं. फिरोज दस्तूर आणि गुरुभगिनी गंगुबाई हनगल यांच्यासमवेत सुरू केलेल्या स्मृती मैफलीचे रूपांतर संगीत महोत्सवामध्ये झाले. प्रारंभी आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होणारा हा महोत्सव रेणुका स्वरूप प्रशाला, नूमवि प्रशाला अशी वाटचाल करून शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर अनेक वर्षे स्थिरावला. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील तीन दिवस रात्रभर चालणाऱ्या या स्वरोत्सवामध्ये रसिक मंत्रमुग्ध होत असत. कुडकुडत्या थंडीमध्ये अंगात स्वेटर आणि शाल परिधान करून रसिक संगीत श्रवणाचा आनंद लुटत. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. मात्र, हे स्थळ पुणेकरांना न रुचल्याने महोत्सव पुन्हा रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला. पं. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर या संगीत महोत्सवाचे नाव ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे करण्यात आले.