पुणे : राज्यातील सांस्कृतिक वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. कोकणातील सावंतवाडीतील खेळणीचे अनेकांना औत्सुक्य असते. ही खेळणी आणि वारली शैलीतील कलात्मक दागिन्यांनी आता ‘ऑक्सफोर्ड’च्या शब्दकोशावर मानाचे स्थान मिळविले आहे. ‘ऑक्सफोर्ड’ने निर्मिती केलेल्या दोन शब्दकोशांच्या मुखपृष्ठावर सावंतवाडीची खेळणी आणि वारली शैलीतील कलात्मक दागिने साकारण्यात आले आहेत.
दीपोत्सवाच्या काळात ‘वर्ल्ड डिक्शनरी डे’ गुरुवारी साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने ‘कम्पॅक्ट मराठी–इंग्रजी डिक्शनरी’ आणि ‘मिनी मराठी–इंग्रजी डिक्शनरी’ या शब्दकोशांची निर्मिती केली आहे. या शब्दकोशांच्या मुखपृष्ठावर सावंतवाडी येथील लाकडी खेळणी आणि हस्तकलेचे कलात्मक दागिने साकारण्यात आले आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुकांत दास यांनी ही माहिती दिली.
‘जगभरात कोट्यवधी लोक मराठी भाषेत व्यवहार करतात. मराठी ही समृद्ध भाषा आहे. या भाषेत संपन्न असा सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे इथल्या सांस्कृतिक वारशाला ‘ऑक्सफोर्ड’च्या दोन नवीन मराठी शब्दकोशांच्या मुखपृष्टावर सावंतवाडीची खेळणी आणि हस्तकलेचे कलात्मक दागिने साकारण्यात आले आहेत,’असे दास यांनी नमूद केले.
‘प्रत्यक्ष भाषावापराच्या आधारे शिकणाऱ्यांना मदत करण्यासाठी हे शब्दकोश तयार करण्यात आले आहेत. मराठीच्या साहाय्याने इंग्रजी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑक्सफोर्ड कम्पॅक्ट मराठी-इंग्रजी डिक्शनरी’ हा शब्दकोश तयार करण्यात आला आहे. या शब्दकोशात मराठी मूळशब्द, त्यांची व्याकरणिक माहिती, इंग्रजी अर्थ, संधी, उपपदे यांचा समावेश आहे. इंग्रजीत प्रावीण्य असलेल्यांसाठी ‘ऑक्सफोर्ड मिनी इंग्रजी-मराठी डिक्शनरी’ हा शब्दकोश संदर्भसाहित्य म्हणून तयार करण्यात आला आहे.
मराठी शिकणाऱ्यांसाठी, अनुवादकांसाठी आणि सर्वसाधारण वाचकांसाठी हा शब्दकोश महत्त्वाचा ठरणार आहे. यात वीस हजारांहून अधिक इंग्रजी शब्द आणि त्यांचे उपशब्द दिले आहेत. त्यांचे मराठी अर्थ स्पष्टपणे मांडले आहेत. प्रत्येक इंग्रजी शब्दाच्या योग्य उच्चारासाठी मार्गदर्शन आणि व्याकरणाची आवश्यक माहिती दिली आहे. त्यामुळे हा शब्दकोश दैनंदिन वापर आणि शैक्षणिक अभ्यासासाठी उपयोगी ठरेल,’ असेही त्यांनी कळविले आहे.
या शब्दकोशाच्या मुखपृष्ठावर साकारलेली वारली कला, सावंतवाडीची खेळणी महाराष्ट्रातील लोकचित्रकलेच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवते. – सुकांत दास, व्यवस्थापकीय संचालक, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया