पुणे : कोरोना विषाणू प्राण्यापासून पसरला, की प्रयोगशाळेतून अपघाताने बाहेर पडला, या शक्यतांचे गूढ जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘सागो’ या तज्ज्ञ समितीलाही अद्याप उलगडले नाही. कोरोना एखाद्या मध्यस्थ प्राण्याच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरल्याची शक्यता अधिक सबळ असल्याचे ‘सागो’च्या नुकत्याच (२७ जून) जाहीर झालेल्या अंतिम अहवालात सांगण्यात आले आहे. तर, कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेतून पसरल्याची शक्यता अधिक असल्याचा दावा पुण्यात यावर संशोधन केलेल्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने २०२१ मध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा शोध घेण्यासाठी एका तज्ज्ञ समितीची (सागो) स्थापना केली. त्यात जगभरातील २७ तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या अहवालात कोरोना विषाणूच्या माणसातील संक्रमणाच्या उगमाबाबत कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कोरोना विषाणू हा एखाद्या मध्यस्थ प्राण्यामधून माणसात संक्रमित झाल्याची शक्यता अधिक सबळ असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

डॉ. मोनाली रहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर या शास्त्रज्ञ दाम्पत्याने ‘कोरोना विषाणू’च्या उत्पत्तीवर चार वर्षे केलेल्या संशोधनात मात्र विषाणू प्रयोगशाळेतून निसटल्याची शक्यता अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘फ्रण्ट्रिअर्स इन पब्लिक हेल्थ’, ‘करंट सायन्स’ आदी नियतकालिकांमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून, ‘‘तो’ नक्की कुठून आला? कोव्हिडच्या उगमाचे रहस्य आणि वास्तव’ या पुस्तकातूनही त्यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमण साखळीचा ऊहापोह केला आहे.

‘विषाणूंना प्रयोगशाळेमध्ये अधिक धोकादायक आणि संक्रमणशील बनवणे म्हणजेच ‘गेन ऑफ फंक्शन’ अशाच एका प्रयोगात कोव्हिड विषाणूचा जन्म झाला असावा. प्रयोगशाळा सिद्धान्ताला पुष्टी देणारे परिस्थतीजन्य पुरावे आणि नक्की काय झाले असावे, याचे आकृत्यांसह स्पष्टीकरण आहे. नैसर्गिक सिद्धान्ताच्या बाजूने आजदेखील कुठलाही पुरावा मिळालेला नाही. अशा प्रकारची महामारी पुन्हा उद्भवू नये, म्हणून जगाने काय काय केले पाहिजे, विषाणूंना अधिक भयानक बनवणारे प्रयोग कसे थांबवायला पाहिजेत, हेदेखील संशोधनात सुचवले आहे,’ असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.

दरम्यान, “सागो’च्या अहवालात कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेतून पसरल्याच्या शक्यतेवर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. चीनने विषाणूच्या उत्पत्तीबाबत महत्त्वाची माहिती दिली नसल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता अजूनही खुलीच आहे. चीनसह संबंधित देशांनी जगाच्या कल्याणासाठी ही माहिती जाहीर करावी,’ असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयसस यांनी केले आहे.

याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथरोग विभागाचे माजी प्रमुख आणि ‘सागो’चे सदस्य डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, ‘कोरोना विषाणूच्या माणसातील संक्रमणाच्या प्रत्येक रस्त्याबाबत माहिती मिळत नाही. संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यावरील पुरावेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विषाणू प्रयोगशाळेतून निसटल्याची शक्यता स्पष्ट होत नाही. वटवाघळातून विषाणूची उत्पत्ती झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, तो माणसामध्ये कशा पद्धतीने संक्रमित झाला, त्यासाठी मध्यस्थ प्राणी कोणता होता, हे अद्यापही सांगता येत नाही.’

‘चीनमधील हुनानच्या बाजारातील एकाही वन्य प्राण्यामध्ये विषाणूचे संक्रमण आढळले नसल्याची माहिती चीनकडून देण्यात आली. मात्र, वुहानच्या प्रयोगशाळेतील अत्यंत महत्त्वाची माहिती चीनने जगासमोर येऊ दिलेली नाही. कोरोना विषाणूचा प्रसार प्रयोगशाळेतून झाल्याचे अनेक परिस्थितीजन्य पुरावे, संशोधन अहवाल आहेत. जगभरातील नामवंत नियतकालिकांमधूनही ते छापून आले आहेत. मात्र, ‘सागो’ समितीने तिकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते,’ असे डॉ. रहाळकर यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील त्यांच्या सरकारी संकेतस्थळावर कोव्हिड विषाणूचा उगम प्रयोगशाळेतून झाल्याचे जाहीर केले. चीनने हे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. विषाणूच्या उत्पत्तीचा शोध इतर देशांमध्येही घेतला पाहिजे, अशी मागणीही चीनकडून करण्यात आली होती.

अनेक परिस्थितीजन्य पुरावे हेच सुचवतात, की कोव्हिड विषाणूचा उगम प्रयोगशाळेतून झाला असावा आणि त्यामुळेच विषाणूंना, जसे की कोरोना, फ्लू, अधिक धोकादायक आणि संक्रमणशील बनवणाऱ्या ‘गेन ऑफ फंक्शन’ संशोधनावर त्वरित नियंत्रण केले पाहिजे. त्यासाठी जागतिक पातळीवर नियम असणे गरजेचे आहे.- डॉ. मोनाली रहाळकर, डॉ. राहुल बहुलीकर

शास्त्रज्ञ-लेखक

कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या उगमाचा शोध घेण्यासाठी आवश्यक असलेले पहिल्या टप्प्यावरील पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे इतर शक्यतांबाबत स्पष्टपणे सांगता येत नाही. कोरोनासारख्या साथरोगांचा प्रसार रोखण्याकरिता योजनांची आखणी करण्यासाठी कोरोना संक्रमणाच्या उत्पत्तीचा शोध घेणे गरजेचे आहे.- डॉ. रमण गंगाखेडकर, शास्त्रज्ञ, ‘सागो’चे सदस्य