संधीचा अभाव ही जशी समस्या असते, तसेच मिळणाऱ्या संधीचा योग्य प्रकारे विनियोग न केल्यामुळे ती संधी हातची सुटते. पण, आज आपल्या अवतीभोवती अनेक मंडळी अशी आहेत, की त्यांनी मिळालेल्या संधीचे वृद्धपणीही सोने केले आणि आपल्याला हवे ते करून आनंदही मिळवला. कालच पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय वृद्ध दिना’निमित्त असेच संधीचे सोने करणाऱ्या हरहुन्नरी सिनेनाट्य कलावंत सीमा पोंक्षे यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

तुम्हाला आयुष्यात वेगळे काय मिळवायचे होते?

  • नाटक पाहण्याची आवड लहानपणापासूनच होती. नाट्यकृतींमध्ये केल्या जाणाऱ्या अभिनयाचे विशेष कौतुक असल्यामुळे आपणही असे काही करू शकू, असा एका बाजूला विश्वास आणि दुसऱ्या बाजूला उत्साह असे दोन्ही होते. पण, घर-संसार, त्यातील जबाबदाऱ्या आणि पती अनिल यांची फिरतीची नोकरी. त्यामुळे वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत असे काही करण्याची संधी मिळाली नाही. एकदा मात्र ती संधी आली. त्या संधीचे सोने तर मला करता आलेच, पण त्याबरोबरच आयुष्यातला आनंदही द्विगुणित झाला. अर्थात, यासाठी पहिल्यापासून माझ्या कुटुंबीयांनी मला दिलेली साथ जेवढी मोलाची आहे, तेवढ्याच माझ्या क्षेत्रात, वेगळेपण शोधत पुढे जात असताना भेटलेल्या व्यक्तीही महत्त्वाच्या आहेत.

आवडत्या क्षेत्रात काम करण्याची सुरुवात कशी झाली?

  • आवडते ते जपण्यासाठी, तसेच जोपासण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. वृत्तपत्रातील ‘प्रशांत दामले संचलित टी स्कूल’ ही जाहिरात मी पाहिली आणि योगायोगानेच, हो-नाही करत ऑडिशनला गेले. या वयात आपली कोणी निवड करणार नाही, ही जाणीव होती, तरीही काही करून पाहण्याची ऊर्मी होती. या ऊर्मीबरोबरच माझ्यातील इच्छाशक्तीने माझ्या आवडत्या क्षेत्राचे दरवाजे उघडले. त्या ऑडिशननंतर माझी निवड झाली आहे म्हणून त्यांचा फोन आला. या वेळी मात्र माझे मन म्हणत होते, या प्रशिक्षणाचा मला आता काय काय उपयोग होणार आहे? या विचारमंथनातून शेवटी मी निर्णय घेतला, की जे काय होईल ते पुढे बघू. त्यामुळे मी तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यात खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मुख्य म्हणजे कलाकार किती मेहनत घेतात याची जाणीव झाली. त्याबरोबरच नाटक कसे बघावे म्हणजेच चांगला प्रेक्षक कसे व्हायचे, हे समजले.

या प्रशिक्षणाचा उपयोग पुढे झाला का?

  • खरे तर पुढे काय करायचे हे काही माहीत नव्हते आणि त्यातच अचानक ‘संक्रमण’ संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेसाठी एका भूमिकेसाठी मला विचारले. तेथून खऱ्या अर्थाने माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. मग पुढे काही एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा असे करत करत मी आणि माझ्या तीन मैत्रिणींनी ‘काही तरी करू या’ या प्रेरणेनेच ‘नाट्यपुष्प’ ही संस्था स्थापन केली. उद्दिष्ट एकच होते ‘आनंद द्या, आनंद घ्या.’ हौशी सहकलाकारांना घेऊन वेगवेगळे उपक्रम आम्ही ‘नाट्यपुष्प’मार्फत राबवले.

‘नाट्यपुष्प’च्या माध्यमातून तुम्ही काय काय करता?

  • नाट्यछटा सादरीकरण, पत्रवाचन, कविता वाचन, प्रार्थना सादरीकरण, एकाच कुटुंबातील कलाकारांचे सादरीकरण, विविध गुणदर्शन अशा अनेक उपक्रमांमध्ये सहकलाकारांना सहभागी करून घेऊन १५ ऑगस्ट २०२४ ला ‘नाट्यपुष्प’तर्फे संस्थेतील हौशी कलाकार घेऊन तीन एकांकिकांचा महोत्सव साजरा केला. त्यामध्ये कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शक संस्थेचेच होते. काही एकांकिकांना दिग्दर्शनाचीही संधी मिळत गेली, तसेच अभिनयही करता आला. एक काम बघून दुसरे काम मिळू शकते, हा विश्वास दृढ झाला. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये संस्थेमार्फत एकांकिका स्पर्धा आयोजित केली. सभासदांच्या सहभागाने आम्ही हे शिवधनुष्य पेलले. हे सगळे सुरू असतानाच एका मराठी सिनेमात छोटीशी, पण महत्त्वाची भूमिका मिळाली. ती भूमिका पाहून पुढे एका मालिकेतही काम करण्याची संधी मिळाली. माझ्या या जीवनप्रवासामुळे मला वाटते, की वाढत जाणाऱ्या वयाचा बाऊ न करता आणि आता काय शिकायचे असे न म्हणता, जीवनाच्या रंगभूमीवर सतत शिकत राहायला हवे. जीवनातला आनंद, उत्साह अबाधित ठेवून शिकत राहणे आणि संधीचा सुयोग्य वापर करणे हे जीवनाचे सार्थक करण्यास साहाय्यभूत ठरू शकते.
    shriram.oak@expressindia.com