पुणे : डेंग्यूवरील प्रभावी उपचारांसाठी मोनोक्लोनल अँटिबॉडी पद्धती ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ विकसित करीत आहे. ही उपचारपद्धती विकसित करण्यास गती देण्यासाठी ‘सीरम’ने ‘ड्रग्ज फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह’ (डीएनडीआय) या स्वयंसेवी संशोधन संस्थेबरोबर करार केला आहे. या करारामुळे गरीब व मध्यम उत्पन्न गटातील देशांना परवडणाऱ्या दरात ही उपचारपद्धती उपलब्ध होणार आहे.

डेंग्यूवरील नवीन उपचार पद्धती विकसित करण्याचा कृती आराखडा ‘सीरम’ आणि ‘डीएनडीआय’ तयार करणार आहेत. त्यात संशोधन व विकासासोबत या उपचार पद्धतींच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचाही समावेश आहे. तसेच, यासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी दोन्ही संस्था संयुक्त पथक स्थापन करणार आहेत. या उपचार पद्धतीच्या अभ्यासातून ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संयुक्त पथक भारत आणि डेंग्यूग्रस्त इतर देशांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचार पद्धतीची नोंदणी आणि तिचा प्रत्यक्षात वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे.

सध्या या उपचार पद्धतीच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. त्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या चाचण्यांत ही उपचार पद्धती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘सीरम’कडून या उपचार पद्धतीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. आता सीरम आणि डीएनडीआय एकत्र येऊन डेंग्यूचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ब्राझीलसह इतर देशांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू करणार आहेत. गरीब व मध्यम उत्पन्न गटातील देशांना परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याचे काम ‘डीएनडीआय’ करते.

भारतात दर वर्षी डेंग्यूचे हजारो रुग्ण आढळून येतात. याचबरोबर दर दोन ते तीन वर्षांनी वेगवेगळ्या राज्यांत डेंग्यूचा उद्रेक होतो. डेंग्यू हा आजार केवळ ठरावीक भागापुरता मर्यादित नाही. यामुळे त्यावर प्रभावी उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. ‘सीरम’ आणि ‘डीएनडीआय’च्या भागीदारीमुळे त्या दिशेने पाऊल पडले आहे.कविता सिंग, संचालक (दक्षिण आशिया), ‘डीएनडीआय’

डेंग्यूचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ब्राझीलसह इतर देशांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचार पद्धतीच्या वैद्यकीय चाचण्यांस गती देण्याचे काम ‘डीएनडीआय’ करणार आहेत. या देशांमध्ये परवडणाऱ्या दरात ही उपचार पद्धती भविष्यात उपलब्ध होणार आहे.डॉ. प्रसाद कुलकर्णी, कार्यकारी संचालक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया