राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख ओबीसी असल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर शरद पवार गटाने भाजपावर सडकून टीका केली. तसेच व्हायरल दाखल खोटा असल्याचं सांगत पवारांचा खरा दाखल माध्यमांसमोर ठेवला. आता स्वतः शरद पवार यांनीच या व्हायरल दाखला आणि त्यांच्या जातीच्या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली. ते मंगळवारी (१४ नोव्हेंबर) बारामतीत माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “माझा दाखला मी बघितला. तो दाखला मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात होतो तेव्हाचा तो दाखल आहे. तो दाखला खरा आहे. मात्र,काही लोकांनी दुसरा इंग्रजीतील खोटा दाखला सोशल मीडियावर फिरवला. त्या दाखल्यात माझ्या नावासमोर ओबीसी लिहिलं. मला ओबीसी समाजाचा आदर आहे. मात्र, जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती मी लपवू इच्छित नाही. त्यामुळे संपूर्ण जगाला माहिती आहे की, माझी जात कोणती आहे.”

“मी जातीवर कधीच समाजकारण आणि राजकारण केलं नाही”

“मी जातीवर कधीच समाजकारण आणि राजकारण केलं नाही. तसेच भविष्यातही जातीवर समाजकारण, राजकारण करणार नाही. मात्र, त्या वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी जो काही हातभार लावता येईल तो मी लावेन,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

“आरक्षण हा प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न”

मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “आरक्षण हा प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. त्यानंतर त्या घटकांनी समन्वयाची भूमिका घेतली. त्या तरुणांनी काही प्रश्न मांडले आहेत. ते प्रश्न केंद्राचे असतील, तर तिथं मांडावे लागतील.”

हेही वाचा : शरद पवार आणि अजित पवार आतून एकत्र आहेत का? सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, “आमच्यासाठी तरी…”

“मराठा आरक्षणाबाबत समाजाची भावना तीव्र आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, यात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला आहे. लोकांच्या भावना तीथपर्यंत पोहचवणं ही कामगिरी आम्हा लोकांकडून होईल. एवढंच मी सांगू इच्छितो,” असंही पवारांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on his viral obc caste certificate and allegations pbs