जहाल विचारांच्या शिवसैनिकांची फळी पुण्यात असताना शिवसेना ही कायम धगधगती असायची. मात्र, ही फळी दूर होत लाभाच्या पदांवर डोळा ठेवून शिवसेनेत येणऱ्यांची संख्या वाढत गेल्यावर पुण्यात ‘निष्ठावंत शिवसैनिक’ आणि ‘पदनिष्ठ शिवसैनिक’ अशी दुफळी निर्माण झाली. त्यामुळे शिवसेनेला पुण्यात दिवसेंदिवस उतरती कळा लागली. राज्यात सत्तेत असतानाही पुण्यामध्ये शिवसेनेची पाळेमुळे फारशी फोफावली नाहीत. ‘आव्वाज कुणाचा?’ अशी आरोळी देताच आसमंतात घुमणारा शिवसेनेचा आवाज दिवसेंदिवस क्षीण होत गेल्याची स्थिती पुण्यातील शिवसेनेची आहे. सध्या पुण्यात एकही आमदार नसलेल्या आणि महापालिकेत मागील पाच वर्षांत अवघ्या दहा नगरसेवकांवर भिस्त राहिलेल्या शिवसेनेची आता विभागणी झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आव्वाज कुणाचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा, हे सत्य लवकरच उघड होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाल्यानंतर पुण्यात पाच वर्षांमध्ये शिवसेनेने पाय रोवण्यास सुरुवात केली. १९७२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविण्यात आली. त्या वेळी काका वडके उमेदवार होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या लीला मर्चंट उभ्या होत्या. त्या निवडणुकीत कसब्यात १९ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये मर्चंट या १४ हजार ५९९ मतांनी विजयी झाल्या. वडके हे दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यानंतर शिवसेनेची पाळेमुळे पुण्यात पसरू लागली. प्रारंभीच्या काळात पुण्यात कोथरुड परिसरातील मतदारांनी कायम शिवसेनेला साथ दिलेली दिसते. राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचा त्यामध्ये मोलाचा वाटा होता. १९७८ मध्ये पुणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेनेची फारशी ताकत आणि संख्याबळ नसतानाही सुतार यांनी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे अध्यक्ष ही महत्त्वाची पदे मिळविली. १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून पुण्यातीलच नव्हेे, तर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले आमदार ठरले. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही त्यांनी विजय साकारला. सुतार यांच्यानंतर शिवाजीनगर मतदारसंघातून १९९९ आणि २००४ या दोन वेळा शिवसेनेकडून विनायक निम्हण आमदार झाले. १९९५ च्या निवडणुुकीत पुण्यात शिवसेनेचे सुतार, भवानी पेठ मतदारसंघातून दीपक पायगुडे आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सूर्यकांत लोणकर असे तीन आमदार होते. पायगुडे हे १९९९ च्या निवडणुकीतही निवडून आले होते.

हेही वाचा – लोकजागर : ‘भावी आमदारां’च्या फलकांना आवरणार कोण?

शिवाजीनगर मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाल्यावर निर्माण झालेल्या कोथरुड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत मोकाटे यांची कोथरुडचे पहिले आमदार म्हणून नोंद झाली. हडपसर हा २००९ मध्ये स्वतंत्र मतदारसंघ झाल्यावर त्या ठिकाणीही शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून महादेव बाबर निवडून आले.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळत गेले. मात्र, गेल्या दहा वर्षांत शिवसेनेची पुण्यात पडझड झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे शिवसेनेला २०१४ पासून पुण्यात उतरती कळा लागली.

शिवसेनेची महापालिका निवडणुकीत साधारणत: १९९७ पासून ताकत वाढलेली दिसते. १९९७ मध्ये १५ नगरसेवक असलेल्या शिवसेनेचे २००७ मध्ये २० नगरसेवक होते. मात्र, त्या वेळी रार्ष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून तयार झालेल्या ‘पुणे पॅटर्न’नंतर शिवसेनेची ताकत क्षीण होत गेली. २०१२ च्या निवडणुकीत जेमतेम १५ आणि २०१७ च्या निवडणुकीत अवघे दहा नगरसेवक निवडून आले. सद्या:स्थितीत दहांपैकी पाच नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या सोबत, तर अन्य पाच जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकत आणखी विभागली गेली आहे.

हेही वाचा – पुणे : हडपसर भागात खोक्यात तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे कोथरुड आणि हडपसर या दोन मतदारसंघांमध्ये माजी आमदार असल्याने हे मतदारसंघ मिळण्यासाठी आग्रही आहे. शिवसेना (शिंंदे) पक्षाला जागा देण्यास महायुतीतील मित्रपक्षांचा विरोध आहे. मात्र, या पक्षाकडून प्रामुख्याने हडपसर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला पहिली लढाई जागा मिळण्यासाठी करावी लागणार आहे. तिकिटाची लढाई जिंकल्यानंतर शिवसेनेला शिवसेनेशीच दोन हात करावे लागणार आहेत. त्याचा फायदा विरोधी पक्षांना होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणत्या शिवसेनेचा पुण्यात आव्वाज आहे, हे आगामी काळात लवकरच स्पष्ट होणार आहे.

sujit. tambade@expressindia. com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena started getting down in pune day by day shivsena presence in pune not increasing pune print news ssb