पुणे :  ‘मराठीच्या अभिजाततेसाठी कृत्रिम प्रज्ञेला (एआय) मराठी शब्दांची, भाषिक व्यवहारांची माहिती पुरवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मराठीत बोलत राहणे, ही प्रत्येक मराठी भाषकाची जबाबदारीच आहे,’ असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी रविवारी व्यक्त केले. ‘‘एआय’ला मराठी आल्यास इतर भाषांमध्येही साहित्याचा, भाषिक व्यवहारांचा अनुवाद करणे, सोपे होईल,’ असेही त्यांनी सांगितले.

शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने सावंत यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे दैनंदिन जीवनातील उपयोग’ या विषयावर भाष्य केले. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, ट्रस्टचे अध्यक्ष मोहन गुजराथी, डॉ. नलिनी गुजराथी, जयंत गुजराथी, कन्हैयालाल गुजराथी, अविनाश शेटजी या वेळी उपस्थित होते. ‘ॲटम्बर्ग टेक्नॉलॉजीज’चे मनोज मीना, ‘काका हलवाई’चे सुरेंद्र आणि अनिल गाडवे यांना ‘उद्यमगौरव’, तर रायगड येथील शबरी सेवा समितीचे प्रमोद करंदीकर, नांदेड येथील डॉ. अशोक बेलखोडे यांना ‘सेवागौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सावंत म्हणाले,‘कृत्रिम बुध्दीमत्तेला अजूनही काही मर्यादा आहेत. त्यामुळेच ‘एआय’ मानवी बुद्धीला पर्याय नव्हे, तर पूरक ठरू शकतो. सध्या ‘एआय’ने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. मात्र, आपण त्याचे बौद्धिक गुलाम नाही, हे स्वतःशीच स्पष्ट करणे आवश्यक झाले आहे.’

 ‘‘एआय’चा वापर करून अवघड, मानवी क्षमतेच्या पलीकडे असलेली कामे अधिकाधिक सोपी आणि अचूक करता येतील. मात्र, माणसाने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवत नेहमी सृजनशील राहिले पाहिजे. तेव्हाच अनेक नव्या संधींची कवाडे आपल्यासमोर खुली होतील.’ असे सावंत यांनी सांगितले.   मीना यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. नलिनी गुजराथी यांनी पुरस्कारार्थ्यांचा परिचय करून दिला. मोहन गुजराथी यांनी प्रासविक, तर अदिती गुजराथी यांनी सूत्रसंचालन  केले. शेटजी यांनी आभार मानले.