ST workers agitation : “ अनिल परब धमक्या देत आहेत, आंदोलन असंवेदनशीलपणे हाताळत आहेत ”

संघर्ष युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांचा आरोप ; कामगारांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवावा, अशी मागणी देखील केली आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

“ परिवहनमंत्री अनिल परब हे एसटी कामगारांचे आंदोलन असंवेदनशीलपणे हाताळत आहेत, ते कामगारांना धमक्या देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन एसटी कामगारांचा प्रश्न सोडवावा.” असे विधान संघर्ष युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील वल्लभ नगर येथे सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनात ते सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी आपण आंदोलनात सहभागी झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितल. मुंबईत आंदोलन सुरू असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

यावेळी शशांक राव म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल होतं. त्यांना विनंती केलेली आहे, की त्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा. कामगारांची विलिनीकरणाची मागणी बरोबर आहे. अनिल परब हे फार असंवेदनशीलपणे हे आंदोलन हाताळत आहेत. धमक्या देणे, कारवाई करणे सुरू आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, ४२ कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी देखील सरकार जागं होत नसेल तर ही चुकीची भूमिका आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचं लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

याचबरोबर त्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये आंदोलन सुरू केलं होतं, पण तिथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेच आंदोलन हे पिंपरीत सुरू ठेवत आहे. अनिल परब यांच्याकडून निलंबन, कामावर या अन्यथा कारवाई होईल अशा धमक्या दिल्या जात आहेत. आमचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. १ लाख कुटुंबांचा प्रश्न आहे. तसेच, प्रवाशांना देखील एसटीची सुविधा मिळणे गरजेचं आहे. असेही शशांक राव म्हणाले आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St workers agitation anil parab is making threats handling the agitation insensitively msr 87 kjp

Next Story
‘आरटीई’च्या प्रवेशांसाठी पॅनकार्ड बंधनकारक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी