पुणे : रामायण, महाभारतात जी युद्धनीती आहे, त्याच युद्धनीतीनुसार भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. याच ज्ञानपरंपरेतील युद्धकौशल्यानुसार २०४७ पर्यंत विश्वगुरू बनलेला भारत पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊन अफगाणिस्तानपर्यंत जाणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले, तर हे करताना भारताकडून दुसऱ्याची जमीन बळकावणे किंवा आक्रमण करणे असे कुठलेच वर्तन केले जाणार नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित १५० व्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाच्या सत्रात ‘भारतीय ज्ञान संपदा-विश्वकल्याणाची गंगोत्री’ या विषयावर चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डाॅ. दीपक टिळक, उपाध्यक्ष डाॅ. रोहित टिळक आणि कार्यवाह डाॅ. गीताली टिळक आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘भारतीय ज्ञानपरंपरेचा, संस्कृतीचा इतिहास पाहिला, तर गेल्या बारा हजार वर्षांत भारताने आतापर्यंत स्वत:हून कोणाचीही जमीन जबरदस्तीने बळकावलेली नाही. कुठल्याही बळाचा वापर करून युद्धाला सुरुवात केलेली नाही. मात्र, वेळोवेळी प्रसंग येता प्राचीन ज्ञानपरंपरेनुसार युद्धकौशल्याच्या ठेव्यानुसार शस्त्राच्या साहाय्याने प्रत्युत्तर दिले आहे. महाभारतात श्रीकृष्णाने जी युद्धनीती अवलंबली त्याचप्रमाणे भारताने वेळोवेळी उत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे रामायण, महाभारतातील युद्धनीतीनुसारच दिलेले उत्तर आहे. त्याचप्रमाणे आधुनिक भारत प्राचीन ज्ञानपरंपरेनुसार पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन अफगाणिस्तानपर्यंत जाईल. कारण अफगाणिस्तान हा आपलाच भाग आहे.’
‘शैक्षणिक धोरणात प्राचीन ज्ञानपरंपरेचा समावेश’
भौतिक सुखवाद आणि स्पर्धात्मक युगातील अर्थव्यवस्थेत सर्वसामान्यांची होणारी होरपळ रोखण्यासाठी, भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण करण्यासाठी ही बलस्थाने वेळीच ओळखून महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणात प्राचीन ज्ञानपरंपरेचा समावेश केल्याचे पाटील यांनी सांगितले.