पुण्यामध्ये अवलियांची कमी नाही. अनोखे उपक्रम सुरू करण्याची जशी हौस, तसे ते टिकवून ठेवण्याची चिकाटीही पुणेकरांत आढळते. सुरू करताना भले एखादा उपक्रम अगदी साधा, सोपा, प्रसंगी फारसा दखल न घेण्याजोगाही वाटेल; पण अनेक वर्षे जेव्हा तो सुरू राहतो आणि अशी अनेक वर्षे सरल्यानंतर त्याकडे पाहणे होते, तेव्हा वाटते, ‘अरे, हा केवळ एक उपक्रम न राहता, तो सरलेल्या काळाच्या दस्तावेजाचा एक महत्त्वाचा तुकडा झाला आहे!’

आज अशाच एका उपक्रमाविषयी, जो एका अवलिया पुणेकराने ३९ वर्षांपूर्वी वैयक्तिक पातळीवर सुरू केला आणि त्या भोवती आज चक्क दोन देशांतील दोन कुटुंबे बांधली गेली आहेत! बरीच वर्षे विपणन क्षेत्रात काम करून आता स्वत:ची सल्लासेवा सुरू करणारे मनीष खाडिलकर यांनी ३९ वर्षांपूर्वी, म्हणजे १९८६ मध्ये – त्या वेळी मध्यमवर्गात ज्याचा हळूहळू बोलबोला होऊ लागला होता, अशा ‘पेनफ्रेंड’ उपक्रमाला सुरुवात केली. जागतिकीकरण अजून यायचे होते; त्यामुळे भूगोलाच्या नकाशात पाहिलेले आणि इतिहासात साम्राज्ये, वसाहती आणि युद्धांच्या निमित्ताने शिकलेले सगळेच इतर देश दूर होते. अशा वेळी तेव्हाच्या शहरी महाविद्यालयीन तरुणांत ‘पेनफ्रेंड’ या उपक्रमाने मूळ धरले. परदेशातील एखादी अनोळखी व्यक्ती पत्राने जोडायची, असे याचे स्वरूप. मनीषना हा उपक्रम समजला, तो सांगलीत त्यांच्या आजोळी ते एकदा सुटीनिमित्त गेले असताना. तेथे घराजवळ राहणाऱ्या, मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या तरुणाने ही संकल्पना मनीषना सांगितली आणि ‘पेनफ्रेंड’ व्हायला उत्सुक असलेल्यांची, त्याच्याकडे असलेली एक यादीही (पूर्वी काही नियतकालिकांतही अशी यादी प्रसिद्ध होत असे) मनीषना दिली.

मनीष यांनी त्या यादीतील जर्मनीत राहणाऱ्या क्रिस्टाला पत्र लिहायचे ठरवले. मनीष यांना क्रिस्टाचे पत्रोत्तरही आले आणि पत्रमैत्रीचा हा सिलसिला सुरू झाला. अर्थात, तो क्रिस्टाबरोबर काहीच काळ टिकला; कारण क्रिस्टाचा पत्र लिहिण्याचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. क्रिस्टाऐवजी तिची बहीण सिल्व्हिया मेयर हीच अधिक उत्साही होती. किंबहुना मनीष यांनी क्रिस्टाला लिहिलेल्या एक-दोन पत्रांना तर तिनेच उत्तर लिहिले होते. मग हळूहळू क्रिस्टा मागे पडून मनीष आणि सिल्व्हिया यांचीच छान पत्रगट्टी जमली आणि साधारण १९८८ पासून तेच दोघे ‘पेनफ्रेंड’ होऊन एकमेकांना पत्र लिहू लागले. सिल्व्हिया जर्मन आणि मनीष मराठी, त्यामुळे पत्रसंवादाची भाषा इंग्रजी. ती दोघांचीही मातृभाषा नसल्याने लिहिलेला बराचसा मजकूर हा एकमेकांकडून ‘समजून’ घेतला जायचा. पण, मनीष सांगतात त्याप्रमाणे यातही गंमत अशी, की यामुळे भाषा हा संवादाचा अडथळा न राहता, काय म्हणायचे आहे, हे समजून घेण्याने मैत्रीतील ‘समजूत’ अधिक घट्ट झाली. शिक्षण, छंद, करिअरचा मार्ग अशा अगदी वैयक्तिक स्तरावरील बाबींपासून हळूहळू नातेवाइक, कुटुंब, मित्र-मैत्रिणी, शहर, सण-उत्सव अशा स्तरापर्यंत मजकुरातील आशय विस्तारत गेला. पत्रे एअरमेलने पाठवली, तर लवकर पोचायची, पण पैसे जास्त पडायचे म्हणून जहाजानेच बऱ्याचदा पाठवली गेली. त्यामुळे आपण पाठविलेल्या पत्राला उत्तर येईल का, कधी आले नाही, तर त्याचे काय कारण असेल, अशी हुरहुर, शंका आणि उत्तर आल्यावर आनंद असे भावनांचे सगळे हिंदोळे या पत्रमैत्रीने अनुभवल्याचे मनीष सांगतात.

अशा वैयक्तिक पत्रसंवादात मजकुराच्या दृष्टीने ख्यालीखुशालीव्यतिरिक्त फारसे काही हाती लागते का, असे वाटू शकते. पण, मनीष यांचा सिल्व्हियाशी झालेला गेल्या ३७ वर्षांतील पत्रव्यवहार चाळला, की लक्षात येते, की एकमेकांना स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या या पत्रांमध्ये दूरदेशी असलेल्या दोन माणसांमध्ये जो जिव्हाळा निर्माण झाला आहे, तो फार अनोखा आहे. एकमेकांना कधीही न भेटलेल्या आणि एकमेकांपासून शेकडो मैल अंतरावर असलेल्या दोन व्यक्तींना एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे, हे कळणे, ख्यालीखुशाली समजत राहणे हाही दोन भिन्न संस्कृतींत वाढलेल्यांच्या संवादाचा एक छोटा, पण महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज असतो. या पत्रांत जशा एकमेकांच्या घरातील वाढदिवस किंवा शुभकार्यासाठीच्या शुभेच्छा आहेत, त्याचप्रमाणे सण-उत्सवांवेळी किंवा कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस वा इतर काही निमित्ताने पत्राबरोबर पाठविलेल्या भेटवस्तू, छायाचित्रे, कुटुंबातील व्यक्तींबरोबर केलेल्या सहलींचे वर्णन, त्यांची विचारपूस असे अनेक स्नेहार्द्र कंगोरे आहेत.

एकमेकांना गेली ३७ वर्षे पत्र लिहिणारे आणि त्यातूनच एकमेकांना, कुटुंबांना आणि भिन्न संस्कृतींना समजून घेणारे मनीष आणि सिल्व्हिया आजच्या समाजमाध्यमी जगात कोणत्याही समाजमाध्यम मंचावर एकमेकांचे ‘फ्रेंड्स’ नाहीत. मधल्या काळात राहत्या घरांचे पत्ते बदलले, तरी केवळ हस्तलिखित पत्रांच्या संवादातून साडेतीन दशकांत दोघांच्या तीन पिढ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. हा लेख संपवताना गुगल मला सांगते आहे, की ‘पेनफ्रेंड’ या शब्दाची व्युत्पत्ती सुमारे शतकभर जुनी आहे. जगात अशी किती जणांची पत्रमैत्री टिकून आहे, हे सांगणे मुश्कील. इतके मात्र नक्की, की जवळपास चार दशके भारतातल्या पुणे शहरातील कोथरूड उपनगरात राहणारे मनीष आणि जर्मनीतल्या बव्हेरिया प्रांतातील विंड्सबाख नगरातील सिल्व्हिया यांच्या पत्रमैत्रीची दखल आधी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि नुकतीच ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेऊन हा दस्तावेज पत्रमैत्रीच्या इतिहासात छान कोरून ठेवला आहे.

siddharth.kelkar@expressindia.com