पुणे : राज्यातील शासकीय आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बीएससी (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला. हा निर्णय मार्च २०२३ पासून लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, विद्यावेतन देण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम चालवला जातो. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना एक वर्ष कार्यप्रशिक्षण पूर्ण करावे लागते. कार्यप्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थी रुग्णालयांमध्ये विविध विभागांमध्ये सेवा देतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्याशिवाय उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने निर्णय घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या १९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.

हेही वाचा – पुणे: एनडीए रस्त्यावर कोयता गँगची दहशत; नागरिकांना मारहाण

शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील शासकीय आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये या प्रमाणे विद्यावेतन देण्यास मंजुरी देण्यात येत आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून, तर महापालिकेअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन महापालिकेच्या मंजूर निधीतून देण्यात यावे. हा निर्णय मार्च २०२३ पासून लागू असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students of bsc paramedical course will get 8000 rupees education salery pune print news ccp 14 ssb