शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली असून, शहरातील १५ गर्दीच्या मार्गांवरील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएलकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर गर्दीच्या मार्गांवरील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस आयुक्तालयात मंगळवारी (३१ जानेवारी) शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल), महामेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), स्मार्ट सिटीचे अधिकारी आदी या वेळी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे कोंडीत भर पडत आहे. काही भागांत मेट्रोचे काम सुरू आहे. अनेक भागांतील रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात ठिकठीकाणी कोंडी होत असल्याचे निरीक्षण बैठकीत अधिकाऱ्यांनी नोंदविले.

हेही वाचा – खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत बोगदा होणार की नाही? प्रकल्पाचे भवितव्य राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या हाती

शहरातील कोंडी सोडविण्यासाठी पोलीस, महापालिका, पीएमपीएल, मेट्रोसह अन्य संस्थांतील अधिकारी एकत्रित काम करणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्यात शहरातील गर्दीचे १५ रस्ते निवडण्यात येणार आहेत. या रस्त्यांची पाहणी, तसेच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या रस्त्यांवरील बसथांबे, सिग्नल, पदपथ याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. वाहतूक कोंडीची कारणे शोधून उपाययोजना करण्यात येणार आहेत.

नियोजनासाठी समिती

शहरातील गर्दीच्या रस्त्यांची पाहणी करून वाहतूक कोंडीचे कारण तसेच उपाययोजना केल्या जाणार आहेत. पोलीस, महापालिका, पीएमपीएमएल, मेट्रोसह अन्य संस्थांमधील प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती तयार केली जाणार आहे. या समितीतील अधिकारी समन्वय साधून एकत्रित काम करणार आहेत.

हेही वाचा – “ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता”, कसबा पेठ पोटनिवडणुकीवर शैलेश टिळक यांचे विधान

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस, महापालिका, पीएमपीएल, मेट्रोचे अधिकारी एकत्रित काम करणार आहेत. पहिल्या टप्यात गर्दीचे १५ रस्ते निवडण्यात आले आहेत. टप्प्याटप्याने शहरातील अन्य रस्त्यांची पाहणी करून वाहतूक सुधारणेबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey of 15 roads to break the traffic jam in pune pune print news rbk 25 ssb