पुणे : हवामान बदलामुळे यंदा गावरान सीताफळाचा हंगाम एक महिना उशिराने बहरला आहे. सध्या बाजारात सीताफळाची उच्चांकी आवक होत आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज २० ते २६ टन सीताफळाची आवक होत आहे. आवक वाढल्याने सीताफळाच्या दरात घट झाली असून, घाऊक बाजारात प्रतवारीनुसार प्रतिकिलो ५० ते १२० रुपये दर मिळाला आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात पुरंदर, हवेली, शिरूर, जुन्नर तसेच सोलापूर आणि अहिल्यानगरमधून सीताफळाची आवक होत आहे. दर वर्षी जून महिन्यात सीताफळाचा हंगाम सुरू होतो. यंदा हंगाम वेळेत सुरू झाला; मात्र हवामान बदलामुळे फळधारणेवर परिणाम झाला. दर वर्षी ऑगस्ट महिन्यात सीताफळाची आवक वाढते. यंदा हंगाम बहरण्यास एक महिना उशीर झाला, अशी माहिती मार्केट यार्डातील सीताफळ व्यापारी माउली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
आठवडाभरात सीताफळाची आवक ४० टक्क्यांनी वाढली आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज २० ते २५ टन सीताफळाची आवक होत आहे. आवक वाढल्याने घाऊक बाजारात सीताफळाच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. घरगुती ग्राहक, फळविक्रेते, प्रक्रिया उद्योगाकडून सीताफळाला मागणी वाढली आहे. सीताफळाचा गर वापरून रबडी तयार केली जाते. सीताफळ स्वस्त झाल्याने मिठाईविक्रेत्यांकडून मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील बाजारातून गुजरात, गोवा, हैदराबाद, बंगळुरू येथील बाजारपेठेत सीताफळे विक्रीस पाठविली जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
गावरान सीताफळाची बाजारात सध्या उच्चांकी आवक होत आहे. सीताफळ स्वस्त झाल्याने घरगुती ग्राहक, फळविक्रेते, तसेच आईस्क्रीमउत्पादक, मिठाईविक्रेते, तसेच प्रक्रिया उद्योगाकडून मागणी वाढली आहे. गावरान सीताफळ चवीला गोड असल्याने प्रक्रिया उद्योगाकडून चांगली मागणी आहे. सीताफळाचा हंगाम जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. नाेव्हेंबर महिन्यात गोल्डन जातीच्या सीताफळाची आवक सुरू होईल. गोल्डन सीताफळ आकाराने मोठे असते, तसेच चवीला थोडे आंबट असते. – माउली आंबेकर, सीताफळ व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड.