पुणे : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) छात्राचा पोहण्याच्या सरावावेळी गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. आदित्य यादव (वय १८) असे या छात्राचे नाव आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागाने या घटनेबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारो दिली. गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास एनडीएमध्ये पोहण्यात सक्षम नसलेल्या छात्रांसाठी प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव सत्र सुरू होते. त्यावेळी अचानक आदित्य यादव अचानक पाण्याच्या पृष्ठभागावर निश्चल अवस्थेत आढळले.

ही लक्षात येताच दोन जीवरक्षकांनी तत्काळ पाण्यात उडी घेत आदित्यला पाण्याबाहेर बाहेर काढले. त्यानंतर त्याला त्वरित कृत्रिम श्वासोच्छवास (सीपीआर) देऊन आणि लष्करी रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्न करूनही आदित्यला वाचवता आले नाही.

या घटनेची माहिती स्थानिक पोलिस, तसेच आदित्यच्या कुटुंबातील निकटवर्तीयांना देण्यात आली असून, घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी औपचारिक चौकशी करण्याचे आदेश एनडीए प्रशासनाने दिले आहेत. या घटनेबाबत एनडीएकडून दुःख व्यक्त करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पंधरा दिवसांतील दुसरी घटना

एनडीएतील छात्राच्या मृत्यूची ही याच महिन्यातील दुसरी घटना आहे. १० ऑक्टोबर रोजी अंतरिक्ष कुमार या छात्राचा मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास अंतरिक्ष कुमार मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली होती.