पुणे : कोथरूड येथील चांदणी चौकात महापालिकेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्यनिर्मिती शिल्प’ उभारले जाणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६० फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार असून, ३० फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २९ कोटी रुपयांचा खर्च येणार असून, यासाठी मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या अंदाज समितीची बैठक महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. ब्राँझ धातूचा हा पुतळा असून, पुणे शहरातील हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असणार आहे. चांदणी चौकाकडून वारज्याकडे जाणारा रस्ता आणि मुळशीकडून कोथरूडकडे जाणारा उड्डाणपूल आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यामध्ये ५ हजार ५४२ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. या जागेमध्ये महापालिकेच्या माध्यमातून ‘हिंदवी स्वराज्यनिर्मिती शिल्प’ साकारले जाणार आहे. त्यामध्ये हा ६० फूटांचा पुतळा असणार आहे.
एकाच ठेकेदाराकडून चौथरा आणि पुतळ्याचे काम करून घेतले जाणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात येणार असून, काम करण्याची मान्यता दिल्यानंतर एका वर्षामध्ये संपूर्ण काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबधित ठेकेदारावर राहणार आहे. हा पुतळा पुणे शहरातील सर्वांत मोठा आणि उंच पुतळा असल्याचे त्याच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. या पुतळ्याच्या कामाचे ‘संरचनात्मक परीक्षण’ (स्टक्चरल ऑडिट) आयआयटी पवई या संस्थेसह महापालिकेच्या वतीने केेले जाणार असल्याचे महापालिकेच्या भवन विभागाचे अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे यांनी सांगितले.
साडेसहा कोटींचा खर्च २९ कोटींवर
चांदणी चौकात यापूर्वी २० फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार होता. पिवळ्या व लाल रंगाच्या आकर्षक दगडातील पदपथ, जागेच्या दुसऱ्या बाजूला छोटे प्रवेशद्वार, आरसीसी सीमा भिंत, तसेच उर्वरित जागेमध्ये उद्यानविषयक कामे करण्यात येणार होती. यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च येणार होता. मात्र, शिवप्रेमींच्या मागणीनुसार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेला पत्र पाठवून २० ऐवजी ६० फुटांचा पुतळा उभारण्याची विनंती केल्याने महापालिकेने हा बदल केला आहे. त्यामुळे हा खर्च साडेसहा कोटी रुपयांवरून २९ कोटींवर गेला आहे.