लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) एका वाहन निरीक्षकांच्या लॉगिन आयडी आणि सांकेतिक शब्द मिळवून त्याआधारे नऊ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ निरीक्षकांच्या तपासणीत ही बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिला वाहन निरीक्षकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका आयपी ॲड्रेस धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती. आरटीओकडून दररोज शेकडो वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली आहे. वाहन निरीक्षकांना सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र द्यावे लागते. हे पोर्टल सुरू करण्यासाठी दररोज सकाळी संबंधित वाहन निरीक्षकांना लॉगिन करावे लागते. त्यानंतर दिवसभर कामकाज सुरू राहते. दरम्यान, संगणकीय प्रणालीत प्रवेश (लॉगिन) केल्यानंतर सांकेतिक शब्द (पासवर्ड) संबंधितांचा मोबाइल क्रमांकावरच येतो. सांकेतिक शब्द टाकल्यानंतर सिटीझन पोर्टल कार्यान्वित होते.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड नामांतराचे पुन्हा फ्लेक्स; PCMC नको जिजाऊ नगरच, शहरभर लागले फ्लेक्स

तक्रारदार वाहन निरीक्षकाचा लॉगिन आयडी आणि सांकेतिक शब्द आरोपीने सिटीझन पोर्टल कार्यान्वित केले. नऊ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र परस्पर दिले. वाहन निरीक्षकांकडून याबाबतची नोंद ठेवण्यात येते. त्याची पडताळणी नियमित केली जाते. तक्रारदार वाहन निरीक्षकांनी पाहणी केल्यानंतर त्यांचा लक्षात हा प्रकार आला. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी याबाबत आरटीओतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. तेव्हा वाहन निरीक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. आरटीओ कार्यालयातील एका कक्षात कामकाज चालते. हे कामकाज सुरू असताना संबंधित वाहन निरीक्षक महिलेचा लॉगइन आयडी आणि सांकेतिक शब्द मिळवून फसवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tampering with rtos computer system uncover the issue of fake qualification certificate pune print news rbk 25 mrj