Tanaji Sawant Son Missing : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत आज (१० फेब्रुवारी) दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली, यानंतर अखेर ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरुप दाखल झाले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
“पुणे विमानतळावरून ऋषीराज सावंत गेले होते. त्यानंतर तात्काळ तपास सुरु करण्यात आला. ऋषीराज सावंत यांनी एक खासगी विमान बूक केलं होतं. ते या विमानातून बँकॉकसाठी रवाना झाले होते. त्यानतंर हे खासगी विमान ट्रॅक करण्यात आले. त्यानंतर आता ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरुप आले आहेत. ऋषीराज सावंतसह एकूण तीनजण होते, ते सुखरुप आहेत. तसेच ते कोणत्या कारणासाठी बँकॉककडे चालले होते? त्यांनी त्यांच्या घरी का सांगितलं नव्हतं? याची माहिती चौकशीनंतर समोर येईल”, अशी माहिती पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ऋषीराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र हे नेमकी कोणत्या कारणासाठी बाहेर चालले होते? याची माहिती आता आम्ही जाणून घेणार आहोत. ही माहिती पुढील चौकशीत समोर येईल. ऋषीराज सावंत हे बँकॉककडे चालले होते. मात्र, आम्ही सर्व यंत्रणेशी संपर्क करत त्यांना परत आणलं आहे. आताच ते पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे ऋषीराज सावंतच्या बरोबरील व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे”, अशी माहिती रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

तानाजी सावंत काय म्हणाले?

“मुलाचे आणि आमचे काहीही वाद झालेले नाहीत. त्यामुळे मी एवढंही सांगितलं की त्याच्याबरोबर त्याचे मित्र आहेत. त्यामुळे अपहरण असं म्हणता येणार नाही. मात्र, आम्हाला न सांगता तो कसा गेला? त्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो होतो. आता त्याच्याबरोबर चर्चा केल्यानंतर यामागचं कारण समोर येईल?”, अशी प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanaji sawant son missing rishiraj sawant returned safely big information of pune police gkt