पुणे : राज्यात मागील चार- पाच दिवसांपासून सर्वदूर असलेला पावसाचा जोर मंगळवारी (२७ ऑगस्ट) ओसरला. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही फारसा पाऊस झाला नाही. मात्र, पावसाने उघडीप देताच उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यभरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छवर होते. त्यामुळे राज्यात असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी दिवसभरात रत्नागिरीत १६ मिमी, कुलाब्यात १७ मिमी, महाबळेश्वरात ७० मिमी आणि नांदेडमध्ये ११ मिलीमीटर पाऊस झाला. विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. बुधवारपासून घाटमाथ्यावरील पाऊस कमी होईल.
हेही वाचा – कौटुंबिक वादातून दोन महिलांचा खुनाचा प्रयत्न; सहकारनगर, कोढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हेही वाचा – पिंपरी : जावई चोरायचा दागिने आणि सासू करायची विक्री; ‘असे’ फुटले बिंग
पावसाचा जोर कमी होताच तापमानात सरासरी तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. किनारपट्टीवर सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढून ३०.५ अंशांवर गेले होते. मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरी तीन अंश सेल्सिअसने वाढून २८ अंशांवर गेले. मराठवाड्यात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढून ३० अंशावर गेले तर विदर्भात सरासरी ३.५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान सरासरी ३२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. मंगळवारी चंद्रपुरात सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज आहे.