पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक अल्पशी कमी झाली. मागणी वाढल्याने भेंडी, काकडी, दोडका, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “खासदार राहुल शेवाळेंनी वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता…”, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२५ डिसेंबर) राज्य; तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, पंजाब आणि मध्य प्रदेशातून मिळून ३० टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून १०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) तोतापुरी कैरी तसेच ३ ते ४ टेम्पो घेवडा, बंगळुरुतून २ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ३० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा- राज्यात तापमानाचा पारा घसरला; नाताळ आला गुलाबी थंडी घेऊन

पुणे विभागातून सातारी आले ८०० ते ९०० गोणी, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, गवार ६ ते ७ टेम्पो, भेंडी ६ ते ७ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कांदा १२५ ट्रक अशी आवक झाली.

पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ

मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिर, शेपू, कांदापात, मुळा, चुका, चवळई, पालक या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली. मेथी आणि अंबाडीच्या दरात घट झाली. चाकवत, करडई, पुदिना, राजागिरा, हरभरा गड्डीचे दर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एक लाख २५ हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या जुडीमागे ५ रुपये, मुळ्याच्या जुडीमागे ३ रुपये, चुका, चवळई, पालकाच्या जुडीमागे २ रुपयांनी वाढ झाली. मेथी आणि अंबाडीच्या जुडीमागे २ रुपयांनी घट झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर होते.

हेही वाचा- विकेंड, ख्रिसमसमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी! लायन्स, टायगर पॉईंट येथे पर्यटक दाखल

खरबूज, संत्र्यांच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील फळबाजारात खरबूज, संत्र्याच्या दरात वाढ झाली. चिकुची आवक वाढल्याने दरात घट झाली. कलिंगड, पपई, सीताफळ, अननस, पेरु, डाळिंब, माेसंबी, बोरे, लिंबांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून ४ ट्रक अननस, संत्री २० टन, मोसंबी ३० ते ४० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे चार ते साडेपाच हजार गोणी, पेरु ८०० ते ९०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी), कलिंगड ८ ते १० टेम्पो, बोरे दीड हजार गोणी, सीताफळ १५ ते २० टन अशी आवक झाली.

हेही वाचा-

मटण, मासळी, चिकनला मागणी

मार्गशीर्ष महिन्याची सांगता झाल्यानंतर मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली. नाताळ सणामुळे रविवारी मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. मटण, चिकनला मागणी वाढली. मार्गशीर्ष महिन्यात महिलांकडून श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते. त्यामुळे गेले महिनाभर सामिष खवय्यांकडून मटण, मासळी, चिकन, अंड्यांना मागणी कमी होती. रविवारी गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची आवक वाढली. आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची आवक झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The arrival of fruits and vegetables in the wholesale market of pune market yard is less than last week pune print news rbk 25 dpj