The Rural Development Department released the third intra-district transfer schedule of teachers in Pune Zilla Parishad schools | Loksatta

जिल्हांतर्गत शिक्षक बदलीचे आता तिसरे वेळापत्रक; बदली प्रक्रिया मेमध्ये पूर्ण करण्याची शिक्षकांची मागणी

शिक्षक बदली वेळापत्रकात वारंवार बदल होत आहेत. प्रशासकीय कारणास्तव शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य झाले नसल्याचे नमूद करून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

जिल्हांतर्गत शिक्षक बदलीचे आता तिसरे वेळापत्रक; बदली प्रक्रिया मेमध्ये पूर्ण करण्याची शिक्षकांची मागणी
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

पुणे जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या वेळापत्रकात वारंवार बदल होत आहेत. ग्रामविकास विभागाने शिक्षक बदलीचे तिसरे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, आता २९ नोव्हेंबर ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षक बदलीचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत. मात्र शैक्षणिक वर्ष संपण्यास काही महिनेच बाकी असल्याने बदली प्रक्रिया मेमध्ये पूर्ण करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- पुणे शहरात रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल; मागणी पूर्ण होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामविकास विभागाने २० ऑक्टोबर रोजी शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र त्या वेळापत्रकानुसार ऐन दिवाळीत ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची टीका झाल्यावर एकाच दिवसात वेळापत्रक रद्द करून नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार ३१ ऑक्टोबर ते ५ जानेवारी या कालावधीत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य झाले नसल्याचे नमूद करून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. आता २९ नोव्हेंबर ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षक बदलीचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत.

हेही वाचा- निधीअभावी पुणे जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले

दरम्यान, शिक्षक बदली वेळापत्रकात वारंवार बदल होत आहेत. शैक्षणिक वर्ष संपण्यास काहीच महिने बाकी असल्याने आता शासनाने शिक्षक बदली प्रक्रिया मेमध्ये पूर्ण करावी. त्यामुळे शिक्षकांचे विद्यार्थी आणि शालेय कामकाजाकडे दुर्लक्ष होणार नाही, असे काही शिक्षकांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 21:21 IST
Next Story
पुणे शहरात रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल; मागणी पूर्ण होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार