पुणे : लोहगाव परिसरात घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्यांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लोहगाव, दिघी, भोसरी, चऱ्होली भागातील १४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. चोरट्यांकडून ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप असा १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जय संजय मोहिते (वय २२, रा. भोसरी), आकाश सुधीर साळवी (वय २३, रा. दिघी), शुभम अशोक मडीवाळ (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली होती. २३ सप्टेंबर रोजी फिर्यादी महिलेच्या लोहगाव येथील सदनिकेतून चोरट्यांनी नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लॅपटॉप चोरून नेले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरूरे यांच्यासह पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे तपास सुरू केला. लोहगाव, दिघी, चऱ्होली भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले.
तपासात पसार झालेल्या चोरट्यांची माहिती पोलीस कर्मचारी योगेश थोपटे आणि ज्ञानदेव आवारी यांना मिळाली. तांत्रिक तपास करून पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून दागिने, लॅपटाॅप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस कर्मचारी योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
बाणेरमधील सदनिकेत चोरी करणारे चोरटे आसाममधून गजाआड
बाणेर परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेतून पाच मोबाइल संच, लॅपटाॅप, रोकड असा मुद्देमाल लांबवून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी आसाममधून अटक केली. चोरट्यांकडून लॅपटाॅप, मोबाइल संच जप्त करण्यात आले. मोहम्मद इमरान इरफान शेख, शेख अफताब अली, शेख हसनअली (तिघे रा. कोलाकाता) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
बाणेरमधील एका सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी लॅपटाॅप, मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल लांबविला होता. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदनिकेत चोरी करणारे चोरटे पश्चिम बंगालमध्ये पसार झाल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक कोलकात्यात पोहोचले. चोरटा मोहम्मद शेख हा आसाममध्ये पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला गुवाहाटीतून अटक केली.
आरोपीं मोहम्मद शेखने चोरलेले लॅपटाॅप कोलकात्यातील चांदणी मार्केटमध्ये विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लॅपटाॅप खरेदी करणारा शेख अफताब अली, शेख हसनअली यांना ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, अतुल इंगळे, गजानन अवतिरक, प्रदीप खरात, प्रीतम निकाळजे यांनी ही कामगिरी केली.