राज्यात सांगली, सोलापूर परिसरात मागील हंगामातील सुमारे तीस हजार टन बेदाणा शिल्लक आहे. नवा बेदाणा फेब्रुवारी माहिन्यात बाजारात येईल, तोपर्यंत हा बेदाणा संपून जाईल. मागील महिनाभरापासून बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरातही सुमारे वीस रुपयांपर्यंत तेजी आली आहे, अशी माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- दोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार

सांगली, सोलापूर, पुणे हे राज्यातील प्रमुख बेदाणा उत्पादक जिल्हे आहेत. मागील हंगामात राज्यात सुमारे १ लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगल्या बेदाण्याला २०० ते २१५ रुपयांपर्यंत दर मिळाले होते. दिवाळीपर्यंत सुमारे दीड लाख टनांची विक्री झाली आहे. सध्या राज्यातील शीतगृहात सुमारे ३० हजार टन बेदाणा शिल्लक आहेे; पण हा बेदाणा फेब्रुवारी महिन्यापर्यंत संपण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत बाजारात येणाऱ्या नव्या बेदाण्यावर त्याचा कोणताही दबाव असणार नाही.

हेही वाचा- पुणे: नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई

तासगाव, सांगली, पंढरपूर येथील बेदाण्याच्या सौद्याला आठवड्याला सुमारे ४०० टन बेदाणा येत आहे. या बेदाण्याची विक्रीही होत असल्यामुळे दरात काहीशी तेजी आली आहे. सध्या १६० ते २५० रुपयांपर्यंत दर्जानिहाय दर मिळत आहे. शीतगृहात साठवलेला बेदाणा दर मिळताच टप्प्या-टप्प्याने विकतात. बेदाणा एकदम बाजारात आल्यावर दर पडतात. त्यामुळे मोठे शेतकरी गरजेनुसार बेदाणा विक्री करताना दिसतात. त्यामुळे बेदाण्याचे दर वर्षभर टिकून राहतात आणि लहान शेतकऱ्यांना दराचा फायदाही मिळतो आहे. सध्या शीतगृहांत साठवलेला बेदाणा सुमारे ३० हजार टन आहे. बाजारात चांगली मागणी असल्यामुळे हा बेदाणा फेब्रुवारीपर्यंत संपेल. नवा बेदाणा फेब्रुवारीत बाजारात येण्यास सुरुवात होईल, अशी माहिती सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.

हेही वाचा- राज्यात १५ डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस; हलक्या सरी ते जोरधारांची शक्यता

यंदा द्राक्ष बागांना हवामानाने चांगली साथ दिली आहे. रोगराईचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची द्राक्षे तयार होत आहेत. पुढील दोन महिने निसर्गाने साथ दिली तर यंदा दर्जेदार बेदाणा मोठ्या प्रमाणावर तयार होईल. बाजारातील दर टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे, असे मत तासगाव गव्हाण येथील बेदाणा उत्पादक प्रशांत जाधव यांनी व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirty thousand tons of currants are left in the state pune print news dbj 20 dpj
First published on: 09-12-2022 at 12:05 IST