शिरुर : ‘हर हर महादेव’, ‘रामलिंग महाराज की जय’ असा जयघोष करीत हजारो भाविकांनी रामलिंग मंदिरातील शिवलिंगाचे  दर्शन घेतले. काल रात्री पासूनच भाविकांच्या रांगा दर्शनासाठी मंदिरात लागल्या होत्या. महाशिवरात्रीला शिरुर येथे रामलिंग महाराजांची  दरवर्षी यात्रा होते. शिरूर पंचक्रोशी व शहर यांचे श्री. रामलिंग महाराज हे आराध्य दैवत आहे. मंगळावर  (दि. २५ फेबृवारीस ) रामलिंग महाराजांचा पालखी सोहळा शिरूरमध्ये झाला. आज  पहाटे अडीच च्या सुमारास शिरूर शहरातील बसस्थानकासमोरून पालखी सोहळा रामलिंग मंदिराकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्यासोबत उद्योगपती व रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक रामलिंग मंदिराकडे पायी रवाना झाले  होते. पालखी मंदिराकडे जात असताना पाबळ फाटा, आनंद सोसायटी, श्री. हाईटसह रामलिंग रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहाटे ग्रामप्रदक्षिणा करून पालखी रामलिंग मंदिरात पोहोचली. यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिर परिसरावर विद्युत रोषणाई केली आहे. त्याच बरोबर आकर्षक अशी फुलांची सजावट ही करण्यात आली होती  भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी दर्शनबारीची व्यवस्था केली होती. महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. मंदिरात पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला. तसेच हरिनाम सप्ताहाचेही आयोजन केले गेले. हजारोंच्या संख्येने भाविकांनी रामलिंग महाराजांचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात विविध खेळणी, खाद्यपदार्थ यांची दुकाने होती. शिरूर बसस्थानकातून एसटी महामंडळाकडून ही आधिकच्या  बस गाड्या रामलिंग मंदिरा कडे सोडण्यात आल्या. आनंद सोसायटीजवळील श्री. हाईट्स सोसायटीतील नागरिकांनी १० हजाराहून आधिक भाविकांना खिचडी, वडे, फळे ताक यांचे वाटप केले. श्रीराम सेने सह विविध  सामाजिक संघटना, विविध संस्था यांच्या वतीने ही खिचडी, केळीचे वाटप करण्यात आले. रामलिंग मंदिराबरोबर देव्हडेश्वर मंदिर,  घावटे मळ्यातील इनामेश्वर मंदिर ,शिवसेवा मंदिर , शिरुर अमरधाम स्मशानभुमीतील महादेव मंदिर , मांडवगण फराटा येथील वाघेश्वर मंदिर , न्हावरा येथील मल्लिकार्जून मंदिर, कारेगाव येथील कारेश्वर मंदिर या ठिकाणीही  भाविकांनी दर्शनासाठी  गर्दी केली होती. उपवासाचे पदार्थ, दही, ताक, केळी, वेफर्स , चिक्की, पेढे यांची मोठी विक्री यात्रेमुळे झाली.शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान काल  प्रभू रामलिंग महाराज कि जय ‘ , ‘ ओम नम : शिवायच्या जयजयकारात  प्रभू रामलिंगाच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान केले .यंदा यात्रा महोत्सवास ५१  वर्ष पूर्ण होत आहे . पालखी मार्गावर सर्वत्र भगव्या  पताका व झेंडे लावण्यात आले होते तर रामलिंग मंदिरा कडे जाणा -या रस्त्यांवर ही ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. शिवसेवा मंदिर येथे रामलिंग महाराजाची पुजा व आरती झाल्या नंतर पालखी सोहळ्याने प्रस्थान केले. पालखी सोहळ्यात  आमदार ज्ञानेश्वर कटके माजी आमदार ॲड. अशोक पवार, रामलिंग देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष  उद्योगपती प्रकाश धारीवाल, , उद्योगपती आदित्य धारीवाल,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे,  घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , भाजपाचे नेते ॲड . धर्मेंद्र खांडरे, रामलिंग देवस्थान ट्रस्ट चे,पोपटराव दसगुडे, बलदेवसिंग परदेशी, रावसाहेब घावटे  नामदेव  घावटे,  जगन्नाथ  पाचर्णे, बबनराव  कर्डिले,  प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष नदकुमार निकम, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, राजेंद्र गावडे , यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

जुन्या नगरपरिषदेजवळ मुख्याधिकारी प्रीतम पाटील  यांनी पालखीचे स्वागत केले. रामलिंग  पालखी सोहळ्याचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे राज्यातील नामांकित ब्रॉस बॅण्डचा सहभाग . यंदाचा वर्षी  चाळीसगाव येथील  सदगुरु ब्रास बॅन्ड,  बारामतीचा अमर ब्रास बॅण्ड, अबंडचा सरस्वती ब्रास बॅन्ड यांनी वाजविलेल्या विविध मराठी ,हिंदीतील धार्मिक गीते, भावगीते व प्रसिध्द चित्रपटातील गीतानी शिरुरकर मंत्रमुग्ध झाले . ब्रास बॅण्ड वादनाला उस्फूर्त अशी दाद ठिकठिकाणी मिळाली . पालखी सोहळ्यात मावळ येथील डोणे च्या झांजपथकाने लक्ष वेधून घेतले .त्याच बरोबर शिरुर येथील  युवकांचे ढोल ताश्या पथक ही होते. सर्वात पुढे सनई चौघड्याचे सुमधुर वादन सुरु होते. हलवाई चौक गणेश मित्र मंडळ हलवाई चौक,  आझाद हिंद गणेश मित्र मंड्ळ सुभाष चौक ,कुंभार आळी , अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळ मुंबई बाजार, यशवंतराव चव्हाण चौक,  आडत बाजार या ठिकाणी पालखीचे  स्वागत करण्यात आले .रामलिंग महाराज यात्रेची सांगता  गुरुवार दिनांक २७ फेबृवारीस बैलगाड्या शर्यतीचा घाटाने होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of devotees darshan of ramalingam maharaj on occasion of mahashivratri pune print news zws