शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाकडून प्रस्तावित शाळा वाहतूक आराखड्याअंतर्गत तीन प्रस्ताव अंतिम करण्यात आले आहेत. या तीन प्रस्तावांची चाचणी शहरातील नऊ शाळांमध्ये घेण्यास सुरुवात झाली आहे. परदेशातील ‘स्कूल सेफ झोन’ संकल्पनेवर ही योजना हाती घेण्यात आली आहे. यामध्ये शाळेचा एक किलोमीटरचा परिसर त्यासाठी विकसित केला जाणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: रिक्षा संघटनांतील वर्चस्ववादात प्रवासी वेठीला; आणखी एका संघटनेकडून पुन्हा रिक्षा बंदचा इशारा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने शाळा वाहतूक आराखडा करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याबाबतची कार्यवाही महापालिकेच्या वाहतूक विभागाकडून सुरू झाली आहे. शाळा वाहतूक आराखड्यासाठी महापालिकेने खासगी वास्तू रचनाकारांकडून प्रस्ताव मागविले होते. याातील तीन प्रस्ताव अंतिम करण्यात आले असून पादचारीदिनाच्या निमित्ताने या प्रस्तावांची विभागानुसार शाळांमध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (१६ डिसेंबर) चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतर प्रस्तावाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानुसार करण्यात येणार आहे.
शाळा वाहतूक आराखड्यासाठी महापालिकेने नऊ विभाग केले आहेत. डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहगाव-धानोरी, कोथरूड, पर्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा आणि खराडी या भागांचा यामध्ये समावेश आहे. या आराखड्यानुसार विद्यार्थी कोणत्याही अडचणीशिवाय आणि कोणावर अवलंबून न राहता सुरक्षितपणे शाळेत जाऊ शकेल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.सध्या खराडी, डेक्कन आणि पर्वती या भागातील नऊ शाळांमध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. पालक आणि विद्यार्थी यांना त्याबाबतची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. पोलिसांचीही या उपक्रमासाठी मदत घेतली जात आहे.