राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला असून त्याची कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी केली जाणार असल्याची ग्वाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावरून जनतेची फसवणूक केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भाजप नेते अमर साबळे यांना मातृशोक झाल्याने सांत्वनासाठी दानवे त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यानंतर, पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
दानवे म्हणाले,की पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत, त्यासाठी राज्यशासनाने नियुक्त केलेल्या कुंटे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. अजित पवार आता म्हणतात, याविषयी निर्णय घेऊ. इतकी वर्षे सत्तेत असताना व आश्वासने देऊनही त्यांनी कृती केली नाही. नागरिकांची फसवणूक केली. भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून अशी फसवणूक होणार नाही. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती करायची की नाही, याविषयीचा निर्णय स्थानिक पातळीवरून काय मागणी होते, त्यावर असलय़ाचेही ते म्हणाले.