पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) दुहेरी उड्डाणपुलाचे (डबलडेकर) काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. डिसेंबरअखेर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
प्राधिकरणाकडून हिंजवडी ते शिवाजीनगर ‘मेट्रो प्रकल्प-३’ मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गात आनंदऋषीजी चौकात दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावर दुहेरी वाहतूक, तर वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे. औंध ते शिवाजीनगर या एका बाजूचे काम पूर्ण होऊन हा मार्ग २० ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, उड्डाणपुलाच्या बाणेर, पाषाणकडील दोन बाजूंची कामे अद्यापही सुरू आहेत.
औंधवरून शिवाजीनगरकडे जाणारी पुलाची एक बाजू खुली झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शिवाजीनगरहून औंध, बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या प्रवाशांना अद्यापही वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या आराखड्यात सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक या पुलाला जोडण्यात आली नव्हती. सुधारित आराखड्यात हा बदल करून ग्रेड सेपरेटरची लांबी ३०० मीटरने कमी करण्यात आली आहे. तसेच, सेनापती बापट रस्त्यावरून बाणेर आणि पाषाणकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाला दोन मार्गिका रॅम्पद्वारे जोडण्यात येणार आहेत.
औंध ते शिवाजीनगर दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बाणेरकडील बाजू महिनाभरात, तर पाषाणकडील बाजू डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल.- डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
