पुणे : ‘पिया तोसे नैना लागे रे’, ‘मेरे नैना सावन भादो’, ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’, ‘वो हे जरा खफा खफा’ अशी बहारदार गीतांची मालिका स्वरमंचावरून सादर होत होती. गीतांच्या सादरीकरबरोबरच त्यांच्या आठ‌वणी जागवीत लतादीदींना असे स्वरांनी अभिवादन करण्यात आले. सलग दहा तास सुरू असलेल्या या स्वरमैफिलीमध्ये लतादीदींची १०१ गीते सादर करण्यात आली. या उपक्रमाची नोंद ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली.

लता मंगेशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गायिका आरती दीक्षित यांच्या संकल्पनेतून कर्वे रस्त्यावरील अंबर हाॅल येथे हा अनोखा कार्यक्रम सादर झाला. ‘लतांजली’ या नावाने सादर झालेल्या या कार्यक्रमात सलग १०१ गीतांची सुरेल मैफल रंगली. हार्मनी इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संस्थापक आमोद देव आणि अपूर्वा देव यांच्या आयोजनातून पार पडलेल्या या संगीतमय आदरांजलीत ३५ हून अधिक कलाकारांनी एकल आणि द्वंद्व गीतांच्या सादरीकरणातून लतादीदींना अभिवादन केले. प्रशांत कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या ‘लतांजली’ कार्यक्रमाची सलग दहा तासांनी म्हणजे रात्री आठ वाजता सांगता झाली.  

आरती दीक्षित यांच्या समवेत संजीव टांकसाळी, मिलिंद दामले, तुषार साधले, अनिता तळेले, ममता नरहरी, मृणाल भिडे, सुजाता माळवे, निशी बोथे, स्वाती बोरावके, विद्या हजारे, गायत्री बेलसरे, अश्विनी दातार, शिल्पा, वसुधा कुलकर्णी, मीनाक्षी दुसाने, शुभांगी पांचाळ, मृणालिनी चव्हाण, वर्षा भालेराव, प्रेरणा जेऊरकर, दिशा वालावलकर, सुनीता जाधव, भावना शुक्ला, मीना अवचट, शमा देशपांडे, श्रद्धा चौधरी, संजय खटावकर, अनघा धोपाटे, जयश्री रोकडे, गायत्री लडकत, माधव राखेलकर, रवींद्र क्षीरसागर, सोमनाथ हिवराळे, आमोद देव, प्रकाश सावंत, मोहित पारखी, दिलीप करमरकर अशा ३५ कलाकारांनी मराठी आणि हिंदी गीते सादर करून  कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये योगदान दिले.

राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांच्या हस्ते सर्व सहभागी गायक कलाकारांना प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर यांची १०६ गाणी सलग सादर करण्याच्या उपक्रमाची ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याचे डॉ. इंद्रजित मोरे यांनी जाहीर केले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एका दिवसात लतादीदींच्या १०१ गाण्यांचा अविस्मरणीय अनुभव रसिकांनी घेतला.