पुणे : तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ९० हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात राहायला आहेत. त्या शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी चारच्या सुमारास तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. हुतात्मा बाबू गेणू चौकातून त्या तुळशीबागेकडे जात असताना चोरट्याने गर्दीत त्यांच्या पिशवीची चेन उघडून ९० हजारांचे दागिने लांबविले. दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार सुरवसे तपास करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळी, गणेशोत्सवात तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी होती. गर्दीत महिलांकडील दागिने लांबविण्याच्या पाच घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तुळशीबागेत महिलांकडील दागिने लांबविण्याचे सत्र कायम आहे. तुळशीबागेतील चोरी, गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तुळशीबागेत महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटना वाढल्याने या भागात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी, तसेच दिवाळीत होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात बंदोबस्तासाठी पोलीस ठेवण्यात यावेत, अशी मागणी तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी केली आहे.
ज्येष्ठाकडील दोन लाखांची सोनसाखळी चोरी
पीएमपी प्रवासी ज्येष्ठाकडील दोन लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट स्थानकात घडली. याबाबत एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कात्रज भागातील आंबेगाव परिसरात राहायाल आहेत. ते शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री नऊच्या सुमारास स्वारगेट स्थानकातून आंबेगावकडे निघाले होते. पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यंनी त्यांच्या गळ्यातील एक लाख ९५ हजारांची सोनसाखळी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक कोतकर तपास करत आहेत. पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने, मोबाइल संच लांबविण्यच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील गर्दीच्या पीएमपी स्थानकांवर चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. पीएमपी प्रवाशांकडील दागिने लांबविण्याच्या दिवसाआड एक ते देान घटना घडतात. पीएमपी प्रवाशांकडील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.