पुणे  : आलिशान आणि आरामदायी अशा अत्याधुनिक कॅराव्हानची सेवा उबरने दिल्लीत सुरू केली होती. दिल्लीत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनीने या सेवेचा विस्तार आता पुणे, मुंबई आणि बंगळुरूत केला आहे. शहरातून दूरच्या प्रवासाला जाण्यासाठी या मोटरहोम्सचा पर्याय प्रवाशांसाठी चांगला ठरणार आहे. मुंबई, बंगळुरू आणि पुण्यात १५ ऑक्टोबरपासून इंटरसिटी मोटरहोम बुक करता येतील. या बुकिंगची सुरूवात १३ ऑक्टोबरपासून सुरू होईल. दिल्लीमध्ये आधीपासून याची सेवा सुरू आहे. उबर इंटरसिटीद्वारे दूर अंतरावरील प्रवास अथवा पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी ऑगस्टमध्ये मोटरहोम सेवा सुरू करण्यात आली.

आरामदायी प्रवासाची इच्छा असलेल्या प्रवाशांकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला. यंदा पावसाळी पर्यटन हंगामादरम्यान दिल्लीत राबविण्यात आलेल्या एका महिन्याच्या पथदर्शी उपक्रमात प्रवाशांकडून या मोटरहोमला शंभर टक्के मागणी दिसून आली. दिल्लीनंतर इतर शहरातूनही या सेवेची मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू झाली. यातून अशा सेवेसाठी देशात असलेली वाढती मागणी दिसून आली.

याबाबत उबर इंडियाचे संचालक शिव शैलेंद्रन म्हणाले की, दोन शहरांमधील प्रवासांसाठी उबर इंटरसिटी हे विश्वासार्ह, आरामदायक असा पसंतीचा पर्याय बनले आहे. लोक जलद भेट, कौटुंबिक गाठीभेटी आणि व्यवसाय भेटीसाठी दुसऱ्या शहरात जाताना इंटरसिटीला प्राधान्य देत आहेत. आता यापुढील टप्पा म्हणून मोटारहोम सेवेचा विस्तार केला जात आहे. यातून लांब अंतराचा प्रवासही आरामदायी होणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर हा पर्यटनाचा काळ मानला जातो.  सण, लग्नसमारंभ आणि आल्हाददायक हिवाळ्यामुळे हा काळ प्रवासासाठी अनुकूल असतो. थंड तापमान आणि स्वच्छ आकाश यामुळे हा काळ आठवड्याच्या अखेरीस अथवा पर्यटनासाठी नागरिक या काळात मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. याच काळात सुट्या जास्त असल्याने कुटुंबेही बाहेर पडतात. त्यामुळे या काळात दोन शहरांतील प्रवासासाठी सेवेची मागणी वाढते, असे उबरने म्हटले आहे.

सुविधा काय? 

प्रत्येक इंटरसिटी मोटारहोममध्ये टेलिव्हिजन, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिनी-रेफ्रिजरेटर आणि स्वच्छतागृह या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास अनुभव मिळतो. या वाहनांमध्ये ४ ते ५ प्रवाशांसाठी आरामदायक बैठक व्यवस्था असते. संपूर्ण प्रवासात मदत करण्यासाठी एक चालत आणि एक मदतनीस असतो. उबर इंटरसिटीप्रमाणेच मोटरहोम सेवा आधीच बुक करता येते. प्रवासादरम्यान मधील थांबे वाढविण्याची, रिअल टाइममध्ये राईड ट्रॅक करण्याची आणि २४ तास लाइव्ह सपोर्टची सुविधाही उपलब्ध असते. मोटारहोम नियोजित प्रवासाच्या किमान ४८ तास आधी बुक करणे आवश्यक आहे.