एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीवर गुंडाकडून हल्ला करण्यात आला. युवतीच्या मैत्रिणीला गुंडाने मारहाण केल्याची घटना हडपसर भागताील फुरसुंगी परिसरात घडली.

हेही वाचा >>>पुणे: रुपीच्या पाच लाखांपर्यंतच्या रकमेसाठी ठेवीदारांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

या प्रकरणी आशिष मारुती दणके (वय २४, रा. हरफळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका अल्पवयीन युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती आणि आरोपी दणके ओळखीचे आहेत. दणके याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी तक्रारदार युवतीचा पाठलाग करत होता. त्याने तिला प्रेमाची गळ घातली होती. दणके विवाहित असून युवतीने याबाबतची माहिती त्याच्या पत्नीला दिली. त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता.

हेही वाचा >>>पुणे: ‘घाशीराम कोतवाल’चा मूळ संचातील प्रयोग पाहण्याची दुर्मीळ संधी उद्या; संगीत नाटक अकादमीकडून चित्रीकरण युट्यूबवर खुले

युवती फुरसुंगी भागातून निघाली होती. दणकेने युवतीला धक्का दिला. आज तुला मारुन टाकतो, अशी धमकी देऊन त्याने युवतीवर कोयत्याने हल्ला चढविला. प्रसंगावधान राखून युवतीने वार हुकवला. युवतीबरोबर असलेल्या मैत्रिणीला मारहाण करुन दणके पसार झाला. युवतीच्या खुनाचा प्रयत्न, विनयभंग केल्या प्रकरणी दणकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक डमरे तपास करत आहेत.