पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आलेले अन्न प्रक्रिया आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांना शुक्रवारी धायरी परिसरातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. नऱ्हे येथील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निघालेला केंद्रीय राज्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. या निमित्ताने सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

  धायरीतील पारी कंपनी चौक परिसरातील अर्धा किलोमीटर अंतरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. गर्दीच्या वेळी विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या रांगा येथे दिसतात. नऱ्हे येथे प्रल्हादसिंग पटेल यांची दहा वाजता बैठक होती. नऱ्हे औद्योगिक क्षेत्र असल्याने या परिसरातील कंपनीत येणारा कामगार वर्ग, शहराच्या वेगवेगळ्या भागात जाणारे कामासाठी जाणारे नागरिक यामुळे रस्त्यावर गर्दी झाली. त्यातून वाहतूक कोंडी होऊन त्यांचा ताफा त्यात अडकला.  त्यामुळे वाहतूक पोलिसांची एकच धावपळ उडाली.

  केंद्रीय जल आयोगाच्या विश्रामगृहात प्रल्हादसिंंग पटेल यांचा मुक्काम होता.  तेथून ते नऱ्हे येथील बँक्वेट हॉलमधील कार्यक्रमास आले होते. तेथून ते नांदेड चव्हाण बाग, धायरी उंबऱ्या गणपती चौक, पारी चौक असा त्यांचा कार्यक्रम ठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग होता. या भागातील अरूंद रस्ते, अवजड वाहनांची वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा पुढे आला आहे. बैठकीनंतर प्रल्हादसिंग पटेल या बैठकीनंतर भोर विधाननसभा मतदारसंघाकडे रवाना झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister state pralhad singh patel on baramati tour hit by traffic jam pune print news ysh